शेतीच्या आधुनिकीकरणासाठी जैन तंत्रज्ञानाचा वापर
नायगावच्या युवा शेतकऱ्याने शेती केली हायटेक
कृष्णा पाटील/ रावेर
शेती म्हटली की सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो मजुरांचा. शेतीच्या मशागातीपासून तर उत्पादन येण्यापर्यंत विविध कामांसाठी मनुष्यबळाची आवशकता असते. मात्र सध्या सर्वांचाच ओढा शेतीपेक्षा नोकरी करण्याकडे अधिक असल्याने शेतीत राबण्यासाठी पाहिजे तेवढे मजूर उपलब्ध होत नाहीत. ही आजची शेती व्यवसायाची स्थिती आहे. यामुळे पिकांचे नियोजन कोलमडत असल्याने त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीवर होतो. यावर मात करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील विशाल किशोर महाजन या युवा शेतकऱ्याने पर्याय शोधून काढत मशागातीपासून तर फर्टिगेषणपर्यंत अत्यधुनिक यंत्रांचा व साधनांचा वापर करीत उत्पादनात भरीव वाढ केली आहे. पिकांच्या खत व पाणी व्यवस्थापनवर विशेष भर देत त्याने यासाठी जैन इरिगेशन कंपनीच्या तंत्रज्ञानाचा आधार घेतला. याचा परिणाम म्हणून पारंपारिक पद्धतीने उत्पादन घेताना पाच वर्षापूर्वी त्यांना मिळणारी २२ किलोची केळीची रास आता ३० किलोपर्यंत पोहचली आहे.
शेती नेली १३ वरून ८० एकरवर
विशाल महाजन हे नायगाव येथील रहिवाशी असलेल्या किशोर महाजन यांचा एकुलता एक मुलगा. किशोर महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती होती. मात्र अथक परिश्रम घेत श्री. महाजन यांनी ती शेती पिकांच्या उत्पादनाद्वारे एकत्र कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातून ८० एकर पर्यंत वाढविली. किशोर महाजन व त्याचे बंधू विभक्त झाल्यानंतर श्री महाजन यांच्या हिस्स्याला ४० एकर शेती मिळाली असून सध्या हि शेती त्यांचा मुलगा विशाल पाहत आहे.
शेतीत बदल करण्यासाठी कृषीचे शिक्षण
विशालला शेतीची बालपणापासूनच आवड होती. त्यामुळे भविष्यात नोकरी न करण्याचा निर्णय त्यांचा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच झालेला होता. त्यामुळे शेती व्यवसाय करण्याचा निश्चय निशित असल्याने शिक्षणासाठी कृषी अभ्यासक्रमाची वाट निवडली. कृषी पदवीचे शिक्षण विशालने पूर्ण केले. मात्र व्यावसायिक शेती करण्यासाठी योग्य नियोजन व व्यावहारिकता असली पाहिजे या हेतूने त्यांनी बिझिनेस अग्री म्यानेजमेंट या अभ्यासक्रमाची पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते आता यशस्वीपणे शेती करीत आहेत.
शेतीत आणले तंत्रज्ञान
शिक्षणाचा फायदा घेत शेती करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला शेती मशागतीसाठी वापरले जाणारी पारंपारिक अवजारे त्यांनी बाजूला करीत टक्टरद्वारे चालणारे पलटी फाळ नांगराचा प्रथम त्यांनी वापर करीत संपूर्ण शेतीची मशागत केली. पावर टीलरचा अवजाराचा वापर आंतर मशागतीसाठी केला. ह्यारो यंत्राचा वापर करीत जमिनी भुसभुशीत केली. व पारंपारिक लागवड पद्धतीला फाटा देत बेड पद्धतीचा वापर करीत जैन टिश्युकल्चर रोपांची केळीची लागवड केली. विजेचा सातत्याने निर्माण होणारा प्रश्न सोडविण्यासाठी जनरेटरची व्यवस्था केळी आहे. लागवडीसाठी ६ बाय ५ फुट असे दोन खोडांमध्ये अंतर कायम ठेवले. यामुळे केळीच्या वाढीवर चांगला परिणाम जाणवला.
जैन तंत्रज्ञानाचा व्यवस्थापनासाठी आधार
चाळीस एकर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी त्यांनी प्रथम सर्व पाईपलाईन अद्यावत केल्या. दरवर्षी केळीचे उत्पादन घेण्याच्या दृष्टीने त्यांनी शेतीचे तीन भागात विभाजन केले. त्यामुळे दरवर्षी १३ ते १५ एकरवर केळीची लागवड केली जाते. संपूर्ण शेतीचे पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यावर विशाल महाजन यांनी भर देत संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले. त्यासाठी त्यांनी जैन कंपनीचे आटोमेषण यंत्रणा कार्यान्वित केली. या आधुनिक यंत्रणेचा वापर करीत हा युवा शेतकरी पिकासाठी पाण्याचे खतांचे योग्य व्यवस्थापन करीत असल्याने केळीसह इतर पिकांच्या उत्पादनात भरीव अशी वाढ झाल्याचे ते सांगतात. पाच वर्षापूर्वी विशालचे वडील केळीचे पारंपारिक पद्धतीने उत्पादन घेत असत. तेंव्हा त्यांना २० ते २२ किलो पर्यंत केळीची रास मिळत होती. मात्र विशालच्या व्यावसायिक शेतीच्या दृष्टीकोनातून व आधुनिक साधनाचा वापर केल्याने केळीच्या रासमध्ये तब्बल ८ किलोची वाढ झाली आहे. सध्या ३० किलो पर्यंत रास त्यांना मिळत आहे.
मजुरीवरील खर्च वाचला
यंत्र अवजारे यांचा वापर व आटोमेषण सारखी आधुनिक यंत्रणा यामुळे लागणाऱ्या मजुरांची संख्या निम्याने घटली आहे. त्यामुळे मजुरांवर होणारा निम्मा खर्च वाचला असून त्याचबरोबर आटोमेषणमुळे वीज खर्चातही बचत झाली आहे. पाणी व खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने पिकांच्या गरजेनुसार करता येत असल्याने त्याचा फायदा निश्चितच पिकांना होऊन उत्पादनात वाढ झाली आहे.
हळद टरबूज लागवडीचा प्रयोग
केळी मुख्य पिक असले तरी त्याच सोबत हळद ,टरबूज या पिकांचेही उत्पादन घेत केलेले प्रयोग विशालने यशस्वी करून दाखवले. याशिवाय कापूस, तूर, हि पिके घेतली जातात.
अरब देशात केळी निर्यात
केळीची लागवड करतांना लागवडीपासून तर कापणी पर्यंतचे पूर्ण नियोजन लागवडीवेळी केले जात असल्याने पूर्वी दीड ते दोन वर्षापर्यंत चालणारा या पिकाचा हंगाम कालावधी योग्य नियोजनामुळे एक वर्षावर आणला आहे. लागवडीपासून १२ महिन्याच्या आत पूर्ण कापणी करीत घेतलेले उत्पादन बाजार भावापेक्षा अधिकचा दर मिळवून देऊ शकले असे विशाल महाजन यांनी सांगितले. गुणवत्ता व दर्जा असल्याने केळी अरब देशात निर्यात करण्यात या युवा शेतकऱ्याला यश मिळाले आहे.
“आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतीला व्यवसायाचे स्वरूप देत पिकांचे उत्पादन घेतल्याने चांगला नफा मिळू शकला. तसेच केळीची गुणवत्ता व दर्जा राखल्याने परदेशात निर्यात करीत अधिक भाव मिळू शकला.
विशाल किशोर महाजन,(मो.९५९५७४१०२१) युवा शेतकरी, नायगाव,ता. मुक्ताईनगर जि. जळगाव