Breking : बेपत्ता माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील यांचा मृतदेह सापडला
३६ तासापासून शोध होता सुरू, मृतांची संख्या तीन
कृषीसेवक न्युज नेटवर्क/रावेर
बुधवारी येथील नागझिरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात माजी उपनगराध्यक्ष सुधीर गोपाल पाटील वाहून गेले होते. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेला त्यांचा शोध शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह हाती लागल्यावर थांबला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या तीन झाली आहे.
बुधवारी रात्री मुसळधार पावसाने शहराच्या मध्यातून जाणाऱ्या नागझिरी नदीला पूर आला होता. जूना सावदा रोडवरील पुलावरून घरी जाणाऱ्या सुधीर पाटील यांची मोटारसायकल या पुरात वाहून गेली होती. उशीर होऊनही घरी परत न आल्याने त्यांचा कुटुंबीयांनी शोध घेतला असता त्यांची मोटारसायकल या पुलाखाली अढळून आली होती. बुधवारी रात्रीपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध पोलिस, महसूल विभाग, माजी नगरसेवक ऍड सूरज चौधरी, अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन व त्यांचे पदाधिकारी शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नातेवाईक व मित्रमंडळीतर्फे सूरु होता. अखेर ३६ तासानंतर शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील आसराबर्डी भागात असलेल्या खदाणीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. बुधवारी रात्रभर, गुरुवारी पूर्ण दिवस, व पुन्हा शुक्रवारी सकाळपासून सुधीर पाटील यांचा शोध सुरु होता. अखेर ३६ तासानंतर सुधीर पाटील यांचा मृतदेह हाती लागल्यावर उपस्थितांचे डोळे पाणावले.