शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय : कृषीसमृद्धी योजनेसाठी ५६६८ कोटी मंजूर
ड्रोन, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी मिळणार अनुदान
मुंबई : कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र आणि ट्रॅक्टरचलित रुंद सरी वरंबा (BBF) यंत्रांसाठी सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पुढील ३ वर्षासाठी ५ हजार ६६८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्य शासनाच्या कृषि विभागाच्या प्रचलित योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा (BBF) यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी आणि मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन हे घटक अधिक विस्तृत स्वरुपात राबवून राज्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने या घटकांची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी समृद्धी योजनेतून ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार घटकांचा समावेश आहे. यामध्ये २५ हजार रुंद सरी वरंबा यंत्रासाठी १७५ कोटी, १४ हजार वैयक्तिक शेतळ्यासाठी ९३ कोटी, शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी ५ हजार कोटी आणि ५ हजार ड्रोनसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध शेती उपयोगी यंत्र पुरवणे, जैविक निविष्ठ निर्मिती केंद्र उभारणे, प्लास्टिक अस्तरीकरण, शेततळे, एकात्मिक कीड नियंत्रण, अन्नद्रव्य घटक व्यवस्थापन, मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारणी, शेतीसाठी ड्रोन या आदी बाबींचा समावेश आहे.
राज्यभरात २५ हजार बीबीएफ यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी एक यंत्र दर हंगामात सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर काम करू शकते. परिणामी २५ लाख हेक्टर क्षेत्रावर ही पद्धत लागू करता येईल. तसेच बियाण्याचा वापर ३-४० टक्के कमी आणि उत्पादनात १५-२० टक्के वाढ अपेक्षित असून यंत्राच्या किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ७० हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच, राज्यात १४ हजार शेततळ्यांच्या बांधकामासाठी मान्यता दिली गेली आहे. त्याचसोबत, काळी चिकणमाती असलेली जमीन प्राधान्याने निवडली जाईल. वाहत्या पाण्यात किंवा दलदलीच्या भागात कुंड्या घेता येणार नाहीत. यामध्ये शेडच्या आकारानुसार १६ हजार ८६९ ते १ लाख ६७ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.
सरकारने २ हजार ७७८ शेतकरी सुविधा केंद्रे उभारण्यास मान्यता दिली आहे. प्रत्येक केंद्रासाठी सरासरी प्रकल्प खर्च ३ कोटी रुपये असून कमाल सरकारी अनुदान मर्यादा १ कोटी ८० लाख रुपये ठेवण्यात आले आहे. यामध्ये मृद परीक्षण प्रयोगशाळा, जैविक खत उत्पादन केंद्र, भाडेतत्त्वावर अवजारे व ड्रोन उपलब्धता केंद्र, गोडाऊन व शीतसाखळी सुविधा, कीडनियंत्रण सामग्री व अन्नद्रव्य घटक याचा समावेश आहे. या नव्याने उभारण्यात येत असलेल्या शेतकरी सुविधा केंद्रांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच, केंद्र शासनाच्या नमो ड्रोन दिदी योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन याअंतर्गत राज्यात ५ हजार कृषी ड्रोन अनुदानावर दिले जातील. यामध्ये, ड्रोन किमतीच्या ५० टक्के किंवा ८ लाख रुपये अनुदान कृषी पदवीधरांना दिले जाईल. इतर लाभार्थ्यांना ४० टक्के किंवा ४ लाख रुपये अनुदान दिले जाईल आणि ड्रोन खरेदीसाठी, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल."
योजनेसाठी पात्रता :
२०२५-२०२६ ते २०२७-२०२८ या तीन वर्षासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला
* अर्जदार राज्यातील सातबारा धारक असावा.
* शेतकऱ्याकडे अॅग्रीस्टॅक फार्मर नोंदणी क्रमांक आवश्यक.
* कृषी विभागाच्या महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करावा.
* प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ या तत्वावर लाभार्थी निवड.
* निवड झालेल्या लाभार्थ्यांना डीबीटीतून थेट बँक खात्यावर अनुदान जमा.
* शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्याना लाभ.
शेतकऱ्यांना मिळणार असा लाभ
25,000- बिबीएफ यंत्र
14,000- शेततळे
5,000 - शेतकरी ड्रोन
2,778 - कृषी सुविधा केंद्र

krushisewak 
