रावेर मतदार संघातून 14 उमेदवारांची माघार : 9 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात
काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण
प्रतिनिधी / रावेर
रावेर विधानसभा मतदार संघाच्या येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी आज माघारीची दुपारी तीन वाजता मुदत संपली. एकूण 14 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले. तर 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माघारीनंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हाचे वाटप निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी जाहीर केले. यावेळी खर्च निरीक्षक तहसीलदार बी ए कापसे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर उपस्थित होते.
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. अंतिम उमेदवारांची यादी यावेळी जाहीर करण्यात आली. तसेच चिन्हाचे वाटप उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधिच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात पक्ष व चिन्ह ) : धनंजय शिरीष चौधरी( काँग्रेस हाताचा पंजा ), अमोल हरिभाऊ जावळे (भाजप कमळ ), दारा मोहम्मद जाफर मोहम्मद(अपक्ष रिक्षा ), अनिल छबीलदास चौधरी( प्रहार जनशक्ती बॅट ), नारायण हिरामण अडकमोल (बसपा हत्ती ), आलीफ खालीफ शेख (अपक्ष रोडलोलर ), मुस्ताक कमाल मुल्ला(अपक्ष किटली), शमीभा भानुदास पाटील (वंचित बहुजन आघाडीगॅस सिलेंडर) खाल्लोबाई युनूस तडवी (ऑल इंडिया हिंदुस्थान पार्टी टीव्ही )