रावेर बाजार समितीच्या नोकर भरतीच्या चौकशीचे आदेश : १५ दिवसांत डीडीआरने अहवाल मागवला
संचालक मंदार पाटील यांनी केली होती तक्रार
प्रतिनिधी / रावेर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या नोकर भरती बाबत संचालक मंदार पाटील यांनी जिल्हा उप निबंधकांकडे तक्रार केली आहे. यामुळे झालेली नोकर भरती अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भरतीबाबत रावेरचे सहायक निबंधक यांना चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून त्याचा अहवाल १५ दिवसांत जिल्हा उपनिबंधकांनी मागवला आहे.
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या महिन्यात नोकर भरती केली होती. मात्र याबाबत खुद्द बाजार समितीचे संचालक मंदार पाटील यांनी झालेल्या नोकर भरती विषयाची सर्व कागदपत्र, गुणपत्रक, उमेदवार छाननीचे निकष व संचालक मंडळाच्या ठरावाची सत्यप्रत याबाबत जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांच्याकडे केलेल्या तक्रारीद्वारे चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार बिडवाई यांनी १७ नोहेंबरला रावेरच्या सहायक निबंधक यांना चौकशी करून १५ दिवसांत अहवाल मागवला आहे. यामुळे झालेली नोकर भरती अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही
.