SUCCESS STORY : पुण्यातील नोकरीला रामराम : गडचिरोलीच्या मधकन्येची मधुमक्षिका पालनात गगन भरारी

प्राजक्ता आदमने यांनी केली "कस्तुरी हनी" ब्रँडची निर्मिती

SUCCESS STORY :  पुण्यातील नोकरीला रामराम : गडचिरोलीच्या मधकन्येची मधुमक्षिका पालनात गगन भरारी

सुनील पोकरे / पुणे 

कोणतेही काम करण्याची मनाची तयारी व ध्येय निश्चित असले की त्यात हमखास यश मिळतेच असे नेहमी अनेकांच्या तोंडून ऐकायला येते. मात्र मधुमक्षिका पालनाचा कोणताही पूर्वानुभव नसतांना गडचिरोली येथील प्राजक्ता आदमने या महिलेने मधुमक्षिका पालनातून स्वतःचा व्यवसाय उभारला आहे. या व्यवसायामुळे प्राजक्ताची विदर्भात "मधकन्या" ही नवी ओळख निर्मण झाली आहे. पुण्यात चांगल्या पगाराच्या असलेल्या नोकरीला रामराम ठोकत प्राजक्ताने या व्यवसायातून स्वतःचा "कस्तुरी हनी" ब्रँड विकसित केला आहे. प्राजक्ताने हिम्मतीने सुरु केलेल्या या व्यवसायातील प्रगती इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. 

कुटुंबाला व्यवसायाची पार्श्वभूमी 

प्राजक्ता आदमने या मूळच्या गडचिरोली येथील रहिवासी आहेत. वडिलांचा बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय तर आई शिक्षिका असलेल्या सामान्य कुटुंबातील प्राजक्ता ही युवती. १२ वी पर्यंत गडचिरोली येथे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यानंतर औषध निर्माण शास्त्रात पदवी संपादन केली. पुढील एमबीएच्या शिक्षणासाठी प्राजक्ताने पुणे गाठले. तेथे एमबीएची पदवी घेतल्यावर पुण्यातच एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर मोठ्या पगाराची नोकरी मिळाली.

नोकरीला रामराम 

गडचिरोली सारख्या वनसंपदेने नटलेल्या व निसर्ग संपन्न भागात वास्तव्य असल्याने प्राजक्ताचे मन पुण्यात रमले नाही. तिला गावाकडची ओढ सातत्याने खुणावत होती. जंगलातून हिसंक पद्धतीने मध गोळा करणारे दृश्य तिच्या डोळ्यासमोर येत होते. याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा निर्णय घेत प्राजक्ताने उच्च पदाची नोकरी सोडून गावाकडचा मार्ग धरला. 

प्रथम कुटुंबाचा विरोध नंतर साथ 

नोकरी सोडून घरी आल्यावर मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करण्याचा प्राजक्ताने निर्णय घेतला. मात्र हा व्यवसाय जोखमीचा असल्याने याला प्रथम कुटूंबियांनी विरोध केला. परंतु यात कसे यश मिळू शकते हे कुटुंबियांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी साथ दिली. शिक्षण घेत असताना मधुमक्षिका पालनाबाबत माहिती मिळवली होती. ती व्यवसाय उभारणीवेळी कामात आली. तसेच दिल्लीत जाऊन मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण घेतले. महिलांच्या दृष्टीने हा व्यवसाय अत्यंत जोखमीचा असल्याने सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पण हार न मानता संघर्ष करीत व्यवसायाची उभारणी केली. 

५० पेट्याद्वारे व्यवसायाला सुरुवात 

प्रशिक्षण घेऊन परतल्यावर गडचिरोलीच्या जंगलात अगदी सुरुवातील ५० मधुपेट्या घेऊन मधमाशीपालन व्यवसायाची प्राजक्ताने मुहूर्तमेढ रोवली. व येथून सुरु झालेला या व्यवसायाचा प्रवास सातत्याने पुढे जात आहे. सुरुवातीला मधाच्या हंगामात ७०० किलो मध उत्पादन झाले. आज शेकडो किलो मधाचे उत्पादन प्राजक्ता घेत आहे. त्यांच्या या प्रकल्पाला अनेकांनी भेटी दिल्या. त्यातून या व्यवसायाचा आपोआपच प्रचार व प्रसार झाला.  

कस्तुरी ब्रॅण्डची निर्मिती 

मधुमक्षिका पालनातून मोठ्या प्रमाणावर मधाचे उत्पादन मिळू लागले. ते मध तसेच न विकता त्याची बाजारात विक्री करण्यासाठी प्राजक्ता आदमने यांनी स्वतंत्र "कस्तुरी हनी" ब्रॅन्डची निर्मिती केली. एमबीएच्या शिक्षणाचा उपयोग मार्केटिंग करताना झाला. आज गडचिरोलीला मधाचा जिल्हा म्हणून ओळख मिळाली आहे. 

मधुवसाहती व साहित्याची विक्री 

स्वतःचा व्यवसाय उभा राहिल्यावर अनेकांना या व्यवसायाच्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न प्राजक्ताने केला. यासाठी मार्गदर्शन तसेच या व्यवसायासाठी लागणाऱ्या मधुवसाहती व साहित्याची विक्री त्यांनी सुरु केली आहे. यातून गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा व्यवसाय उभा राहत आहे. 

विदर्भातील ११ जिल्ह्यात प्रसार 

नागपूरच्या खादी ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून हनी मिशन अंतर्गत मधमाशांच्या वसाहती पुरवण्याचे काम तसेच केव्हीआयसीची मास्टर ट्रेनर म्हणून प्राजक्ता काम पाहत आहे. बेरोजगार, महिला, युवक व शेतकरी बांधवाना प्रशिक्षण  देण्याचे काम करीत आहे. विविध कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन आहारात मधाचे सेवन वाढावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.मधमाशी संवर्धनाची गरज लक्षात घेऊन मधमाशी पालन जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गडचिरोली येथील मध निर्यातीला चालना देण्यासह शालेय अभ्यासक्रमात मधमाशी पालन व त्यांचे महत्व हा विषय समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे.  

प्राजक्ताचा कार्याबद्दल गौरव 

मधमाशी पालन हा व्यवसाय शेतीपूरक असल्याने या व्यवसायाचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्याचे काम प्राजक्ता करीत आहे. संघर्षातून उभारलेल्या व्यवसाय व निर्माण केलेल्या कस्तुरी हनी ब्रॅण्डची दखल घेऊन विदर्भ रत्न पुरस्काराने प्राजक्ता आदमने यांना गौरविण्यात आले आहे. तसेच बेस्ट महिला उद्योजिका , स्वयंसिध्दा पुरस्कार यासह अनेक संस्थांनी गौरविले आहे. 

        (या यशोगाथेचे लेखक सुनील पोकरे हे असून ते पुणे येथील  केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त सह संचालक आहेत. )