शिक्षक होण्याची संधी असताना शेतीची निवडली वाट

केऱ्हाळ्याच्या अमोल पाटलांची शेतीला यांत्रिकीकरणाची जोड

शिक्षक होण्याची संधी असताना शेतीची निवडली वाट

कृष्णा पाटील / रावेर 

शिक्षक होण्यासाठी बीएडचे शिक्षण घेतलेल्या केऱ्हाळा ता रावेर येथील अमोल गणेश पाटील यांनी शिक्षक होण्याची संधी असूनही ती नाकारत शेतीची वाट निवडली. शेतीत विविध नवनवीन प्रयोग राबवून ते खऱ्या अर्थाने शेतीतील शिक्षक  झाले आहे. ज्या शाळेत त्यांनी शिक्षकाच्या नोकरीसाठी मुलाखत दिली होती त्याच शाळेचे ते सध्या चेअरमन आहेत.स्वतःच्या कौशल्याचा वापर करीत त्यांनी हवामान यंत्र निर्माण केले आहे. त्याचा त्यांना पिकांच्या व्यवस्थापनाकरिता फायदा होत आहे.

रावेर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर केऱ्हाळा गाव आहे. या गावाला लाभलेली काळी कसदार जमीन, मुबलक पाणीसाठा व कष्टकरी शेतकरी वर्ग यामुळे गावाची ओळख तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात समृद्ध गाव अशी आहे. वडील गणेश दत्तू पाटील यांचा मूळ व्यवसाय शेती. अमोल पाटील यांनी पदवी प्राप्त केल्यावर शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या बीएड पदवीचे शिक्षण घेतले. त्यांना शिक्षकाच्या नोकरीची संधीही मिळाली होती. मात्र बालपणापासून शेतीशी घट्ट असलेली नाळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी त्यांनी नोकरीचा विचार बाजूला सारत व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्याचा निर्णय घेतला.

शेतीला यांत्रिकीकरणाची जोड

त्यांच्याकडे ४० एकर बागायती शेती असून ३० एकरवर बागायती तर १० एकरवर कोरडवाहू पिके घेतली जातात. मात्र शेती कसताना मजुरांची मोठ्या संख्येने गरज पडते. तसेच वेळही अधिक लागून यावर मोठा खर्च होतो. हे लक्षात घेऊन त्यांनी मजुरांच्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी शेतीत यंत्रांचा वापर सुरु केला. शेतीला यांत्रिकरणाची जोड दिली. ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे कामे ते करतात. तसेच हळद लागवडीसाठी त्यांनी स्वतःच्या कुशलतेने जुने टिलर वापरून  ट्रॅक्टरचलित लागवड यंत्र तयार केले. या यंत्राद्वारे ते हळद पिकाची लागवड करत असणं यामुळे खर्चात बचत झाली आहे.

हवामान यंत्राची केली निर्मिती

त्यांची दरवर्षी मोठ्या क्षेत्रावर केळीची लागवड असते. केळी हे हवामानाला संवेदनशील पीक असल्याने तात्काळ शेतकऱ्यांना हवामानातील बदलाचा अंदाज न आल्यास नुकसान होते. तसेच या पिकाला पाणी , कीड नाशकांची फवारणी, खत व्यवस्थापनाची माहिती मिळण्यासाठी अमोल पाटील यांनी स्वतःच्या शेतात एक लाख रुपये खर्च करीत हवामान केंद्राची निर्मिती करीत उभारणी केली आहे.मोबाईल ऍप च्या मदतीने त्यातून माहितीचे संकलन व कार्यवाही त्यांना करता येते.

कमी खर्चात ऍटोमेशन यंत्रणा

अमोल पाटील यांची एकाच ठिकाणी १६ एकर शेती आहे. या शेतीचे पाणी व खत व्यवस्थापन करणे सुलभ होण्यासाठी त्यांना स्वयंचलित ऍटोमेशन यंत्रणेची माहिती मिळाली. मात्र या यंत्रणेसाठी सुमारे १२ ते १५ लाखापर्यंत खर्च येणार होता. त्यांनी या यंत्राची माहिती घेतल्यावर स्वतःच हि प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न केला. यासाठी यंत्राचे सुटे भाग जळगाव व पुणे येथून मागवले. व हे ऍटोमेशन तयार करण्यात त्यांना यश मिळाले. यासाठी सहा लाख निम्मा खर्च आला. सध्या या यंत्रणेद्वारे १६ एकरवर व्यवस्थापन केले जाते. हवामानावर आधारीत केळी फळ पीक विमा योजनेचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ते लोकप्रतिनिधि व कृषी अधिकारी यांच्या माध्यमातुन सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करत आहेत. 

पिकांची फेरपालट

अमोल पाटील केळी, हळद, मका,कांदा, कलिंगड अशी पिके घेतात. मात्र पिकांच्या फेरपालटवर त्यांचा भर असतो. हळदीचे उत्पादन आल्यावर स्वतःच्या बायलरने तयार करून पॉलिश व प्रतवारी करून त्याची विक्री केली जाते. त्यामुळे त्यांना योग्य भाव मिळतो. त्यांनी २०१७ मध्ये बटाटा लागवडीचा प्रयोग केला. यातून त्यांना एकरी ८ टन बटाटा उत्पादन मिळाले. केळीची २५ ते ३० पर्यंत त्यांची रास असल्याने देशांतर्गत व परदेशात निर्यात होते.  

फुलशेतीचाही प्रयोग

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात केळीची लागवड करत असल्याने तोपर्यंत शेत रिकामे राहू नये म्हणून त्याठिकाणी झेंडूच्या फुलांची लागवड केली जाते. गणेशोत्सव व दुर्गोत्सवात या फुलांना मोठी मागणी असल्याने त्यातून अधिकचे उत्पन्न मिळते. त्यांनी सात एकर केळी बागेत झेंडूच्या फुलशेतीचा आंतर पिकाचा प्रयोग यशस्वी केला आहे. यातून त्यांना ६० क्विंटल फुलांचे उत्पादन मिळाले. त्याच्या विक्रीतून अडीच लाख मिळाले.  

पूरक उद्योगाची जोड  

विविध पिकांचे उत्पादन घेण्यासह पूरक उद्योगांचीही त्यांनी उत्पन्न वाढीसाठी जोड दिली आहे. दुग्धव्यवसाय, मधुमक्षिका पालन, कुक्कुट पालन, शेळीपालन, अळिंबी उत्पादन, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रीयखत निर्मिती अशा पूरक उद्योगांची त्यांनी शेतीला जोड दिली आहे.  

तज्ज्ञाचे मार्गदर्शन

केळीच्या गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम अधिक उत्पादनासाठी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा जेष्ठ केळी तज्ज्ञ के बी पाटील, विद्यापीठाचे व केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन मिळते. वडील गणेश दत्तू पाटील, काका किशोर पाटील व मोठे बंधू विकास पाटील यांची कायम साथ आहे. साप्ताहिक कृषीसेवकमधून विविध विषयांवरील सविस्तर माहिती मिळते त्याचा उत्पादन घेण्यासाठी फायदा होतो.

शेतकऱ्यांनी शेतीला यांत्रिकीकरणाचा जोड देऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्याची गरज आहे. तसेच मागणीनुसार पिकांचे उत्पादन घेतल्यास शेतीतून अपेक्षित नफा मिळवता येतो.

--अमोल गणेश पाटील, शेतकरी केऱ्हाळा ता रावेर मो ९७६४०६९४११