व्हायचे होते फौजदार, वाट वळली शेतीकडे

पातोंडीच्या विनोद पाटील यांची केळी इराणला रवाना

व्हायचे होते फौजदार, वाट वळली शेतीकडे

कृष्णा पाटील /रावेर 

पातोंडी ता रावेर येथील विनोद लक्ष्मण पाटील या युवकाने एमए (अर्थशास्त्र) पदवी घेतल्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. फौजदार बनण्याचे स्वप्न ठेवून त्या दृष्टीने केलेल्या पहिल्याच प्रयत्नांना काही अंशी यशही मिळाले. मात्र १ सेंटिमीटरने उंची कमी पडल्याने मैदानातून बाहेर पडावे लागले. त्याचवेळी नोकरीच्याच मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत शेती करण्याचा निश्चय केला. हा युवा शेतकरी गेल्या ९ वर्षांपासून केळीची बागायती शेती करीत असून गुणवत्ता व दर्जात्मक उत्पादन घेतल्याने त्यांनी उत्पादित केलेल्या केळीची इराण देशात निर्यात करण्याला यश मिळाले आहे . 

फौजदार व्हायचे स्वप्न भंगले 

पातोंडीचे लक्ष्मण पाटील वडिलोपार्जित शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असत. तशी त्यांची घरची परिस्थिती पूर्वीपासूनच चांगली आहे. पाटील यांना विनोद व प्रमोद ही  दोन मुले असून त्यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य व महत्व दिले. विनोदाचे शिक्षण एमए पर्यंत झालेले आहे. तर प्रमोदचे शिक्षण बीए पर्यंत झालेले आहे. विनोद पाटील राज्य सेवा आयोगाच्या पीएसआयची २००३ मध्ये परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांनी  पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत राज्यातून सहावा येण्याचा मान मिळवला होता. मात्र शारीरिक क्षमता चाचणी परीक्षेत उंची एक सेंटिमीटरने कमी पडली. आणि तेथेच फौजदार व्हायचे विनोद पाटीलचे स्वप्न भंगले.

दोघांनी धरली शेतीची वाट  

पातोंडीला तसा समृद्ध वारसा लाभलेला आहे. काळी कसदार सुपीक जमीन, तापी नदीची कृपा असल्याने मुबलक पाणी, व कष्ट करणारा शेतकरी वर्ग यांच्यामुळे गाव संपन्नतेकडे वाटचाल करीत आहे. लक्ष्मण पाटील यांचे पूर्वी एकत्रित कुटुंब होते. मात्र २०१४ ला कुटुंब विभक्त झाल्याने त्यांच्या हिश्श्यावर ४० एकर शेती आली. लक्ष्मण पाटील यांच्या आजारपणामुळे आपसूकच शेतीची जबाबदारी विनोद व प्रमोद या दोघांवर आली. फौजदार व्हायचे स्वप्न उंचीमुळे भंगल्यानंतर विनोद पाटील यांनी नोकरीचा विचार डोक्यातून काढून टाकला. व शेती करण्यास सुरुवात केली. तेव्हा पासुन हे दोघे भाऊ शेती करीत आहेत.  

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  

विनोद पाटील यांनी अर्थशात्र विषयात घेतलेल्या उच्च शिक्षणाचा उपयोग शेतीत करण्याचा निश्चय केला. शेतीत प्रथम त्यांनी व्यावहारिकता आणली. पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीतील आधुनिक नवतंत्रज्ञानाचा त्यांनी वापर सुरु केला. व शेती उत्पादित मालाच्या गुणवत्तेवर अधिक भर दिला. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, व विविध यंत्र अवजारेंचा ते वापर करतात. 

शेती साहित्याच्या वाचनावर भर 

शेतीची लहानपणापासून माहिती असली तरी आधुनिक तंत्रज्ञान समजून घेतले. लागवडीपासून तर कापणीपर्यंत पिकांच्या योग्य व्यवस्थापनाची माहिती मिळवण्यासाठी शेती साहित्याचा, वर्तमान पत्र, साप्ताहिक, मासिक, यासह विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन केले असल्याचे विनोद पाटील सांगतात. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व जेष्ठ केळी तज्ज्ञ के बी पाटील, तांदलवाडीचे प्रगतीशिल शेतकरी सदानंद महाजन, पातोंडीचे नथ्थू बाबुराव पाटील यांचे नेहमी मार्गदर्शन मिळते असे विनोद पाटील सांगतात. साप्ताहिक कृषीसेवक मधून मिळालेल्या माहितीचा शेतीतील बदलासाठी मोठा उपयोग झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

जैन टिश्युकल्चर रोपांची लागवड  

हिश्यावर आलेली ४० एकर व नंतर विकत घेतलेली ५ अशी एकूण ४५ एकर शेती पाटील यांच्याकडे आहे. भाडेपट्ट्याची २० अशी एकूण ६५ एकर शेती दोघे भाऊ कसतात. त्यापैकी दरवर्षी २५ ते ३० एकरवर केळी, १० एकरावर कापूस, तर उर्वरित          क्षेत्रावर मका, हरबरा,गहू व इतर पिके घेतली जातात. पिकांच्या सिंचनासाठी ७ ट्यूबवेल व एक विहीर आहे. संपूर्ण शेती बागायती असून १०० टक्के ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. केळीच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी   पीक लागवडीपासून ते कापणीपर्यंत योग्य व्यवस्थापनवर अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे त्यांच्या केळी बागेची सरासरी रास कायम २५ ते ३० असते.

इराणला केळीची निर्यात 

केळीचे गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक उत्पादन घेतल्याने व्यापाऱ्याकडून विनोद पाटील यांच्या केळी मालाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गेल्या वर्षी देशांतर्गत पाठवलेल्या  त्यांच्या केळीला २५६५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. तर यंदा २ कंटेनर केळीची निर्यात इराणला करण्यात आली आहे. 

शेतीकडे व्यावसायिक व व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. उत्पादित शेत मालाचा उच्च दर्जा व गुणवत्ता असली तर व्यापाऱ्यांकडून अधिक मागणी होते. त्यामुळे भाव चांगला मिळतो. पिकांचे उत्पादन घेताना व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे. 

विनोद पाटील, शेतकरी पातोंडी ता. रावेर ( ९८२२८५७२६६)