जैन इरिगेशनचा शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक प्रयोग : राजगढ जिल्ह्यात खडकाळ जमिनीवर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड

पारंपरिक शेतीला मिळाला नवा पर्याय

जैन इरिगेशनचा शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक प्रयोग : राजगढ जिल्ह्यात खडकाळ जमिनीवर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड
राजगढ जिल्ह्यात राबविलेल्या स्ट्रॉबेरी लागवडीची पाहणी करताना खासदार श्री रोडमल नागर व शेतकरी

कृष्णा पाटील/ रावेर 

मध्यप्रदेशातील खडकाळ जमीन व सिंचन सुविधेचा अभाव असलेल्या राजगढ जिल्ह्यात जैन इरिगेशनने स्ट्रॉबेरी  उत्पादनाचा नवा पर्याय शेतकऱ्यांना निर्माण करून दिला आहे. पारंपरिक शेतीत बदल करीत जैन इरिगेशनने या जिल्ह्यातील खडकाळ जमिनीवर प्रथम केळी, पपई बाग फुलविल्यानंतर आता चक्क स्ट्रॉबेरीची शेती फुलविण्याची किमया केली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक उत्पानांचा नवा मार्ग यानिमित्ताने गवसला आहे.  

मध्यप्रदेशातील राजगढ जिल्हा हा मध्यप्रदेश व राजस्थान  राज्यांच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. येथील खडकाळ जमीन, शेतीला पाणी सिंचनाचा अभाव यामुळे येथे फारशी फळ बागायत केली जात नव्हती. सिंचनाच्या सोयीसुविधा फारशा उपलब्ध नसल्याने शेतकरीही गहू, हरबरा, सोयाबीन, मका, मोहरी यासारखी पारंपरिक पिकांची लागवड करून उत्पन्न घेत होते. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही जेमतेमच आहे. राजगढ जिल्ह्यात मोहनपुरा नावाचा सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पाणी राजगढ जिल्ह्यातील शेतीच्या सिंचनासाठी आणण्याची मध्यप्रदेश सरकारची योजना आहे. मध्य प्रदेश सरकारची सुमारे १ लाख हेक्टरपर्यंत प्रत्येक शेतात पाणी पोहचविण्याची ही योजना जैन इरिगेशनच्या माध्यमातून आकारली जात असून पूर्णत्वास येत आहे. 

खडकाळ जमिनीवर फुलली केळी बाग

राजगढ जिल्ह्यात खडकाळ जमिनीवर फळबाग लागवडीचा पहिला प्रयोग जैन इरिगेशने केळीची ग्रँडनाईन जातीची टिश्युकल्चर रोपांची लागवड करीत केला. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर जैन टिश्युकल्चर पपईची लागवड केली. केळी व पपई लागवडीचा प्रयोग यशस्वी करीत जैन इरिगेशनने पीक पद्धतीत बदल करीत येथील शेतकऱ्यांना फळबाग शेतीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याचा परिणाम म्हणून येथील अनेक शेतकऱ्यांनी जैन टिश्युकल्चर केळी व पपईची लागवड केलेली आहे. शेतीतील नव तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा या माध्यमातून जैन उद्योग समूहाचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने जैन इरिगेशनने उचललेली ही पावले आहेत. 

स्ट्रॉबेरी लागवडीचाही प्रयोग यशस्वी 

जैन इरिगेशनतर्फे मोहनपुरा (जि राजगढ) सिंचन प्रकल्पाच्या परिसरात १५ ऑक्टोबरला जैन टिश्यूकल्चरच्या स्वीट चार्ली या जातीच्या सुमारे ५०० स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली होती. योग्य पाणी व खतनियोजन, उत्कृष्ट पीक व्यवस्थापन यावर विशेष भर दिला. त्यामुळे खडकाळ व हलक्या प्रतीच्या जमिनीवर कमी पाण्यात स्ट्रॉबेरी लागवडीचा व पीक उत्पादनाचा जिल्ह्यात जैन इरिगेशनने राबविलेला पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला आहे. १ डिसेंबरपासून स्ट्रॉबेरीचे हार्वेस्टिंग सुरु झाले असून मार्चपर्यंत हे हार्वेस्टिंग संपणार आहे. एका रोपापासून १ किलो स्ट्रॉबेरीची फळे मिळतात. स्ट्रॉबेरीची बाग फुलविण्यासाठी जैन इरिगेशनचे ब्यावरा येथील वितरक दांगी कृषी सेवा केंद्राचे संचालक बद्रीलालजी दांगी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

ठिबकचा १०० टक्के वापर 

शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा अभाव असलेल्या या जिल्ह्यात केळी , पपई व स्ट्रॉबेरीच्या फळ बाग लागवडीचे प्रयोग करताना जैन ठिबक सिंचनाचा १०० टक्के वापर करण्यात आला. यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेता आले आहे. 

स्ट्रॉबेरी बागेला शेतकऱ्यांच्या भेटी 

राजगढ जिल्ह्यात खडकाळ जमिनीवर ठिबकच्या साहाय्याने फुलविलेल्या स्ट्रॉबेरी बागेची येथील शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या बागेला राजगढ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री रोडमल नागर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत अशी माहिती जैन इरिगेशनचे मध्यप्रदेश स्टेट हेड विवेक डांगरीकर यांनी दिली.  

"शेतीच्या सिंचनाचा अभाव असलेल्या राजगढ जिल्ह्यात जैन इरिगेशनच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर राबविलेला स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. हा प्रयोग शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल." 

---- सतीश अग्रवाल मो.९४०६८०२८०४  एरिया मॅनेजर, जैन इरिगेशन, राजगढ (मध्यप्रदेश)