रा.का. इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणपतीचे आगमन

कार्यशाळेतून विद्यार्थांना पर्यावरण रक्षणाचा संदेश

रा.का. इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणपतीचे आगमन

प्रतिनिधी/रावेर

सध्या देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह संचारलेला असताना, रावेर येथील रा.का. इंटरनॅशनल स्कूलने एक अनोखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण केली. 'गणपती बनविणे कार्यशाळा' आयोजित करून शाळेने विद्यार्थ्यांना मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.  ज्यामुळे कला आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम साधला गेला. शाळेच्या कमिटीचे अध्यक्ष भरतजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र पवार होते. सौ. मानसी पवार व प्रमुख अतिथी अतुल मालखेडे यांच्या हस्ते गणपती पूजन, वंदन व आरती झाली. "कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपतीच्या पूजनाने होते," असे सांगत मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा भरली. 'वक्रतुंड महाकाय' या श्लोकाच्या सामूहिक पठणाने वातावरण मंगलमय झाले. अतुल मालखेडे यांनी मूर्ती बनवण्याबद्दल अत्यंत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. मूर्तीचा कोणता भाग आधी तयार करावा, माती कशी मळावी, यांसारख्या बारकाव्यांसह त्यांनी प्रात्यक्षिक दाखवले. त्यांचे मार्गदर्शन इतके प्रभावी होते की, विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकही या कामात सामील झाले. त्यांनी स्वतःच्या हातांनी सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. या कार्यशाळेला एका स्पर्धेचे स्वरूप दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कलाकौशल्य शिकायला मिळाले. याशिवाय पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा महत्त्वाचा संदेशही देण्यात आला. सर्वोत्तम गणेशमूर्ती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवा यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. शाळेने राबवलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला आणि सामाजिक जाणीव या दोन्ही गोष्टींचा विकास साधला गेला. ही कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.