ग्रामविकास अधिकाऱ्याचे कारनामे : ग्रामविकास अधिकारी सपकाळे यांना नोटीस बजावण्याचा ड्रामा
बीडीओंतर्फे सारवासारव करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/रावेर
१३ जूनला पदोन्नती झाल्यानंतर चिनावलचे ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांना रावेर पंचायत समितीच्या प्रभारी बीडीओ मंजुश्री गायकवाड यांनी तब्बल अडीच महिन्यांनी ३१ आगष्टला कार्यमुक्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तत्काळ कार्यमुक्त करण्याच्या जिल्हा परिषदेच्या सिईओंच्या आदेशाची बीडीओ गायकवाड यांनी पायमल्ली केली आहे. तर हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सपकाळे यांना नोटीस बजावण्याचा ड्रामा केला असल्याची चर्चा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
बचावासाठी नोटीस ड्रामा
चिनावल येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांची जामनेर पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली होती. याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी १३ जूनला काढत बदली ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र बीडीओ गायकवाड यांनी सिईओंच्या आदेशाला तिलांजली देत तब्बल अडीच महिन्यांनी ३१ आगष्टला सपकाळे यांना कार्यमुक्त केले आहे. हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सपकाळे यांना १२ ऑक्टोबरला नोटीस बजावली आहे. मात्र स्वतःच्या बचावासाठी हा बीडीओ मंजुश्री गायकवाड यांचा सरकारी ड्रामा असल्याची चर्चा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
कार्यमुक्ती नंतरही कामकाज सुरूच
ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे यांची पदोन्नती झाल्यानंतर बदली झालेली असताना व रावेर पंचायत समितीने कार्यमुक्त केल्यावर सुद्धा सपकाळे यांनी चिनावल ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरूच ठेवले होते. याला बिडीओ मंजुश्री गायकवाड व ग्राम विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे यांचा पाठिंबा होता. शिंदे यांच्यावर याच ग्रामपंचायतीची प्रशासक म्हणून जबाबदारी आहे. असे असताना सपकाळे यांना त्यांनी कामकाज करू देण्यास सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. तसेच या दोघांनी कार्यमुक्ती नंतरच्या काळात ग्रामपंचायतीचा खर्च केलेला निधी संशयाच्या भोवऱ्यात आहे. शिंदे हे ग्राम पंचायतीचे नियंत्रण अधिकारी असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करून सपकाळे यांना सहकार्य केले आहे. या प्रकरणी शिंदे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अत्यावशक कामासाठी निधी खर्च केला : प्रशासक प्रवीण शिंदे
याबाबत ग्राम विस्तार अधिकारी व चिनावल ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रवीण शिंदे यांची भेट घेऊन सपकाळे यांनी कार्यमुक्त झाल्यावर निधी कसा काढला ? तुम्हाला ते कार्य मुक्त झालेले आहेत असे माहीत असताना तुम्ही निधी काढण्यासाठी का सहकार्य केले ? असे विचारल्यावर अत्यवशक कामासाठी निधी खर्च केलेला आहे असे उत्तर प्रवीण शिंदे यांनी दिले. म्हणजेच शिंदे व सपकाळे यांनी बेकायदेशीरपणे निधीचा वापर केल्याची बाब खुद शिंदे यांनी दिलेल्या माहितीतून उघड झाली आहे.