दसऱ्याच्या मुहूर्तावर रावेर बाजार समितीच्या तीन संचालकांसह सुमारे १०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कॉंग्रेसचे निष्ठावानही भाजपमध्ये दाखल

दसऱ्याच्या मुहूर्तावर रावेर बाजार समितीच्या तीन संचालकांसह सुमारे १०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
दसऱ्याच्या मुहूर्तावर रावेर बाजार समितीच्या तीन संचालकांसह सुमारे १०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रतिनिधी / रावेर

दसऱ्याच्या मुहूर्तावर रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश महाजन, राजेंद्र चौधरी व जयेश कुयटे यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांनी आज जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीतीत त्यांच्या बंगल्यावर प्रवेश घेतला. यावेळी आमदार अमोल जावळे, रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, मंडळ अध्यक्ष एड सुर्यकांत देशमुख उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रावेर तालुक्यातील भाजपला आणखी बळ मिळणार आहे.  

बाजार समितीचे संचालक गणेश महाजन, राजेंद्र चौधरी व जयेश कुयटे हे सभापती व उप सभापतीवरील अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यावेळी भाजपच्या बाजूने उभे राहून या गोटात सामील झाले होते. मात्र आज या तिन्ही संचालकांनी भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गळ्यात रुमाल घालून अधिकृतपणे प्रवेश घेतला आहे. यावेळी कॉंग्रेसचे निष्ठावान राजू सवर्णे यांनी कॉंग्रेसला सोड चिठ्ठी देत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी थेरोळा सरपंच शुभम पाटील, अटवाडा सरपंच ममता कोळी यांच्यासह या ग्रामपंचायतीच्या रेखा महाजन, योगेश महाजन, नितीन धनगर, भगवान धनगर या सदस्यांनी तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक कैलास महाजन, किरण कोळी, रुपेश महाजन, प्रवीण सावकारे, कोळदा ग्रा.प. माजी उपसरपंच बाजीराव ठाकरे (ठेकेदार), कोळदा माजी सरपंच शारदा ठाकरे, दोधा माजी सरपंच श्रीनिवास पाटील, विशाल तायडे निंभोरा बुद्रुक यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केल्याची चर्चा तालुक्यात सुरु असून यापैकी अनेक जण निवडणुकीसाठी इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत.