फासाकडे जाणारी पावले थांबिण्याची ताकद पुरस्कारात : रविकांत तुपकर

रावेरला कृषीसेवकतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा

फासाकडे जाणारी पावले थांबिण्याची ताकद पुरस्कारात : रविकांत तुपकर
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते व माजी आमदार अरुण पाटील, आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ डॉ के बी पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक पी एम बोडके, साप्ताहिक कृषी सेवकचे संपादक कृष्णा पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कृषीरत्न कृषीसेवक पुरस्कार स्वीकारतांना प्रेमानंद महाजन.

प्रतिनिधी/रावेर

शेतकऱ्यांची दखल फारशी कोणी घेत नाही. मात्र कृषीक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून होणारा सन्मान अभिनंदनीय आहे. पुरस्कारामुळे समाजाला प्रेरणा मिळते. कृषीसेवकच्या या उपक्रमात फासाकडे जाणारी पावले थांबिण्याची ताकद आहे असा विश्वास शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. रावेर येथे साप्ताहिक कृषीसेवकतर्फे आयोजित राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार सन्मान सोहळ्यात त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

वर्धापनदिनाचे औचित्य साधून येथील कै. श्रीमती शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण पाटील होते. व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉ के बी पाटील,महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक पी एम बोडके, जलतज्ञ व कृषीतीर्थ मासिकाचे संपादक डॉ सुधीर भोंगळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश धनके, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी राज्याध्यक्ष जे के पाटील, जिल्हा ड्रीप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, महालक्ष्मी बायोजीनिक्सचे संचालक डॉ प्रशांत सरोदे, उद्योजक श्रीराम पाटील, नगराध्यक्षा सौ. संगीता महाजन, नगरसेवक दारा मोहम्मद, राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, माऊली फौंडेशनचे अध्यक्ष डॉ संदीप पाटील, भारती ज्वेलर्सच्या संचालिका सौ भारती गनवाणी, जळगाव फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सीईओ सी एस पाटील, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन, साप्ताहिक कृषीसेवकचे संपादक कृष्णा पाटील, सहयोगी संपादक अनंत बागुल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुरस्कारार्थीच्या कार्याचा आढावा व परिचय असलेल्या गौरव विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत कृष्णा पाटील, अनंत बागुल, तेजस पाटील, शरद राजपूत, राजू खिरवडकर, चेतन पाटील, नंदा पाटील, मनीषा पाटील व कृषीसेवक टीमने केले.

श्री तुपकर पुढे म्हणाले की, शेती क्षेत्रातून लोक आता बाहेर पडत असताना कृषीसेवकतर्फे कृषीक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून केला जाणारा गौरव हा प्रेरणा देणारा आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना शेतकरी संघटीत नसल्याने याला प्रतिकार होत नाही. शेतकऱ्यांनी अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या संघटना मजबूत असल्या पाहिजे. ज्यांची कधी समाजाने दखल घेतली नाही अशा व्यक्तींना शोधून त्यांना पुरस्कार देवून समाजाच्या पटलावर आणण्याचे काम साप्ताहिक कृषीसेवकने केले आहे याबद्दल त्यांनी कृषीसेवकचे अभिनंदन केले. शेतकरी शेतीत अनेक प्रयोग करत असतात. मात्र त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. त्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरु केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी स्वताचे मार्केट उभे केले तरच जागच्या स्पर्धेशी टिकता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी एकसंघ होण्याची गरज असल्याचे मत श्री तुपकर यांनी यावेळी व्यक्त केले.

पुरस्कार जगण्याची प्रेरणा देतात : अरुण पाटील

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना माजी आमदार अरुण पाटील म्हणाले की, कोरोना काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले होते. मात्र शेती हा एकमेव उद्योग या संकटाच्या काळातही सुरु होता. शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता या काळात पिकांचे उत्पादन घेतले व बाजारपेठेत पोहचवले हा शेतकऱ्यांचा समाजाप्रती असलेला त्यागच आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या प्रभावीपणे मांडणाऱ्या प्रसार माध्यमामध्ये साप्ताहिक कृषिसेवकचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या वृत्तपत्राने कायम शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम गेल्या अकरा वर्षात केले आहे. रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना जर शासनाची खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका असेल तर त्याने उत्पादीत केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन कृषीसेवकतर्फे करण्यात येणारा सन्मान समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणारा आहे असे मात श्री पाटील यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या श्रमाची दखल : अमोल जावळे

शेती क्षेत्राची मोठी व्याप्ती आहे. या क्षेत्रात कोट्यावधी हात रात्रंदिवस काम करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या कष्टाची, श्रमाची फारशी दखल घेतली जात नाही. मात्र साप्ताहिक कृषीसेवकने शेतकऱ्यांचा पुरस्कार देवून केलेला गौरव समाजाला दिशादर्शक आहे असे मात आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केले. त्यांनी शेतकऱ्यांनी शेती बरोबरच प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे आवाहन यावेळी केले.

शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : डॉ. के बी पाटील

शेतीत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे शेती करतांना शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करावी. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल. नेहमी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्याचा प्रयत्न साप्ताहिक कृषीसेवकचा राहिला आहे. राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषीसेवकतर्फे होणारा गौरव शेतकरी व समाजाप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविते. कार्यक्रमाचे प्रास्तविक संपादक कृष्णा पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी व आभार सहयोगी संपादक अनंत बागुल यांनी मानले.

३४ पुरस्कारार्थींचा सन्मान

राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार सन्मान सोहळ्यात राज्यभरातील शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, कृषीमित्र, कृषी संस्था या गटातून एकूण ३४ पुरस्कारार्थींचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.