शेतकरी हितासाठी ठिबक संचाच्या उच्च गुणवत्ता, दर्जेदार सेवा व पारदर्शक व्यवहाराची गरज : कृष्णात महामुलकर
शासनाने पूर्वसंमती तात्काळ द्यावी
प्रतिनिधी /बीड
शेतकऱ्यांना आधुनिक ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी वितरकांनी गुणवत्तापूर्ण उत्पादने, उत्कृष्ट सेवा आणि पारदर्शक व्यवहाराला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन ऑल इंडिया इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष कृष्णात महामुलकर यांनी केले.
बीड जिल्हा ठिबक सिंचन विक्रेता संघटनेच्या द्वितीय बैठक व कार्यशाळेचे आयोजन पाली हिल रिसॉर्ट, बीड येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन श्री. महामुलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विक्रेते व वितरकांना मार्गदर्शन करताना त्यांनी ठिबक सिंचन व्यवसायातील गुणवत्ता, सेवा आणि नैतिक व्यावसायिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
ते म्हणाले की, प्रत्येक वितरकाने शेतकऱ्यांना विक्रीपूर्व आणि विक्रीनंतरची सेवा प्रभावीपणे दिली पाहिजे. दर्जेदार ठिबक सिंचन प्रणालीची निवड, योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर सेवा यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल आणि ठिबक सिंचनाचा प्रसार अधिक वेगाने होईल. कमी पाण्यात, कमी खतामध्ये आणि कमी वीज वापरात अधिक उत्पादन मिळवून देणारे ठिबक सिंचन हे शाश्वत शेतीसाठी अत्यंत प्रभावी तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले. ठिबक सिंचनाच्या वापरामुळे कमी पाण्यात अधिक क्षेत्रावर लागवड करता येते. तसेच यामुळे उत्पादनात वाढ होते त्यासाठी शेतकऱ्यांना ठिबकचा वापर करण्यासाठी विक्रेत्यांनी संवाद साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. व्यवसाय करताना शासनाचे सर्व नियम, अटी, जीएसटी, आयकर आणि इतर कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक वितरकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पारदर्शक व शिस्तबद्ध व्यवसायामुळे ग्राहकांचा विश्वास दृढ होतो आणि व्यवसायालाही दीर्घकालीन स्थैर्य मिळते, असे त्यांनी नमूद केले. बीड जिल्ह्यात ऊस, कापूस तसेच इतर नगदी पिकांसाठी ठिबक सिंचनाचा मोठा विस्तार होण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक वितरकाने प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम केल्यास हा व्यवसाय अधिक सक्षम होईल, तसेच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून पाणी, खत आणि विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासनाने पूर्वसंमती तात्काळ द्यावी
यावेळी त्यांनी राज्य शासनाला आवाहन करत यंदाच्या हंगामातील पीएमकेएसवाय (PMKSY ) सबसिडी स्कीम अंतर्गत पूर्वसंमती पत्र प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली. ठिबक सिंचन योजनेचे अनुदान वेळेत उपलब्ध झाल्यास अधिकाधिक शेतकरी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करतील आणि राज्याच्या जलसंवर्धन व कृषी उत्पादनवाढीच्या उद्दिष्टांना मोठी चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेला बीड जिल्ह्यातील ठिबक सिंचन वितरकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकरी हिताचे संरक्षण आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी संघटनेने सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

krushisewak 
