रसलपूर आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचा जागर

गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

रसलपूर आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिनानिमित्त  सांस्कृतिक कार्यक्रमांचा जागर

प्रतिनिधी /रावेर

जागतिक आदिवासी दिनानिमित्त रसलपूर(ता. रावेर) येथील कै. पा. तो. पाटील शिक्षण संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत विविध आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

गावातून प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंदार पाटील होते. यावेळी शालेय परीक्षेत इयत्ता दहावीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा डॉ. अशोक शहाणे, मंदार पाटील, मुख्याध्यापक बाळू महाजन, प्राथमिक मुख्याध्यापक प्रदीप पाटील व शिक्षकांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध आदिवासी गीत गायन तसेच पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरलाल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल पाटील यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.