आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : हळद पिकाचा हमी भाव योजनेत समावेश करा

शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : हळद पिकाचा हमी भाव योजनेत समावेश करा

प्रतिनिधी/रावेर 

रावेर-यावल तालुक्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या हळद पिकाच्या उत्पादीत मालाला व्यापाऱ्यांकडून योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. यावर उपाय म्हणून हळद पिकाचा हमी भाव योजनेत (शासकीय आधारभूत किंमत योजना) समावेश करावा अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. 

रावेर तालुक्यात हळद पिकाच्या लागवडीखाली क्षेत्र मोठे आहे. दरवर्षी यात शेकडो हेक्टरने वाढ होत आहे. केळीची मक्तेदारी असलेल्या रावेर यावल, मुक्ताईनगर, तालुक्यात केळीला पर्यायी पीक म्हणून हळद पिकाची लागवड शेतकरी करीत असून एकरी 175 ते 225 क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकरी घेत आहेत. मात्र व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची भावाबाबत आर्थिक कोंडी केली जात आहे. गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम उत्पादन असतांना व्यापाऱ्यांकडून योग्य भाव दिला जात नसल्याच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी होत्या. याची आमदार अमोल जावळे यांनी दखल घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्र किंवा राज्य शासनाने हळद पिकाचा आधारभूत किंमत योजनेत (हमी भाव )समावेश करण्यासाठी निवेदन देत शासनाचे शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. आमदार जावळे यांचा हळद पीक उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नाचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.