जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह : विकासाच्या योजना आदिवासींपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करावे : आमदार नंदकिशोर महाजन
रावेरला पंचायत समिती कार्यालयात पत्रकार परिषद
प्रतिनिधी/ रावेर
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह म्हणून राज्यभरात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात आदिवासींच्या विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन, सामाजिक व सेवाभावी संस्थांनी प्रयत्न करावेत असे आवाहन विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांनी केले.
वीर भगवान बिरसामुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त येथील पंचायत समितीच्या सभागृहात आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग व पंचायत समितीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार श्री महाजन माहिती देताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार संजय तायडे, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, मंडळ अध्यक्ष रवींद्र पाटील, दुर्गेश पाटील, नगरसेविका सीमा जमादार, कलिंदर तडवी, सहायक बिडीओ के. पी. वानखेडे व आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ११ ते १८ नोव्हेंबर या सप्ताहातील कार्यक्रमाची रूपरेषा श्री महाजन यांनी यावली स्पष्ट केली. १३ नोव्हेंबर- न्युक्लीयस बजेट योजनेंतर्गत निवास झालेल्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, १४ नोव्हेंबर- स्मारकांची स्वच्छता आणि दीपोत्सव १५ नोव्हेंबर- क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती, १६ नोव्हेंबर- आधारकार्ड व शासकीय कागदपत्रे सेवा शिबीर, १७ नोव्हेंबर– आरोग्य व पोषण जनजागृती शिबीर, १८ नोव्हेंबर –आदिवासी आर्थिक,शैक्षणिक,व सामाजिक सक्षमीकरण दिवस व सप्ताह समारोप कार्यक्रम. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

krushisewak 
