उद्योजक श्रीराम पाटील विधानसभेची रावेर मतदार संघातून निवडणूक लढविणार

भविष्यात वारसा परंपरा नसल्याचीही स्पष्टोक्ती

उद्योजक श्रीराम पाटील विधानसभेची रावेर मतदार संघातून निवडणूक लढविणार

प्रतिनिधी /रावेर

येणारी लोकसभेची निवडणूक समविचारी पक्षातर्फे उमेदवारी मिळाल्यास लढवू अथवा रावेर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत येथील उद्योजक श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी दिले आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्यांची भूमिका आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

येथील मॅक्रो व्हिजन शाळेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री पाटील यांनी रावेर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण राजकारणात यावे अशी जनतेची अपेक्षा आहे. मतदार v जनतेच्या आग्रहास्तव निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्रीराम पाटील यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला जळगांव येथील दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा गोपाल दर्जी, श्रीराम उद्योगाचे संचालक प्रमोद पाटील, पिपल्स बँकेचे संचालक सोपान साहेबराव पाटील,विजय गोटीवाले, आर के चौधरी, ऍड प्रविण पाचपोहे, मॅक्रो व्हिजन स्कूल अकडमीचे सचिव स्वप्नील पाटील उपस्थित होते.

लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी दोनतीन पक्ष आपल्या संपर्कात असून समविचारी पक्षाने उमेदवारी दिल्यास रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे संकेत श्रीराम पाटील यांनी दिले. मात्र लोकसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास रावेर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून जनतेसमोर जाणार असल्याचा निर्वाळा पाटील यांनी यावेळी दिला. रावेर मतदार संघातील लोकांना बदल पाहिजे असून जनतेची माझ्याकडुन मतदार संघाच्या विकासाची अपेक्षा आहे. मतदार संघात अनेक पायाभूत सुविधांची वानवा आहे. या सुविधा जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजेत, मतदार संघात सोयीसुविधा निर्माण झाल्या पाहिजेत यासाठी आपण भावी काळात प्रयत्न करणार आहे. 

वारसा परंपरा नसेल

मी काम करणारा माणूस असून आधी काम करतो व नंतर बोलतो असा माझा स्वभाव आहे. मी राजकारणी नसून राजकारणाचा मला कोणताही वारसा नाही. जनतेने काम करण्याची संधी दिल्यानंतर त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. भविष्यात माझ्या कुटुंबातील राजकारणाचा वारसा कोणीही चालवणार नाही हे पाटील यांनी ठामपणे सांगितले. माझी राजकारणाची वारसा परंपरा नसेल असे त्यांनी त्यांचे लहान बंधू प्रमोद पाटील व जावई स्वप्नील पाटील यांना साक्षी ठेवून सांगितले. 

विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार

रावेर विधानसभा मतदार संघात भावी काळात केल्या जाणाऱ्या विकास कामांची ब्ल्यू प्रिंट आपण तयार केलेली असून योग्य वेळी ती जनतेसमोर ठेवली जाईल. शैक्षणिक, उद्योग, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासह शेतकऱ्यांना सोयीसुविधा, ग्रामीण भागातील रस्ते, पाणी प्रश्न, विजेची समस्या असे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. एकंदरीत मतदार संघात कोणती विकास कामे करायची आहेत यासंबधी विकासाची ब्ल्यू प्रिंट आपण तयार केलेली आहे. मी राजकारणात सक्रिय होऊन मतदार संघाचा विकास करावा ही गेल्या काही वर्षांपासून जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणारी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्रीराम पाटील यांनी सांगितले.