राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचा रावेरच्या दोघांना पुरस्कार

विशाल अग्रवाल व दिलीप वैद्य यांची निवड

राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचा रावेरच्या दोघांना पुरस्कार
राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचा रावेरच्या दोघांना पुरस्कार
राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचा रावेरच्या दोघांना पुरस्कार

प्रतिनिधी /रावेर

उत्कृष्ट शेतकरी म्हणून रावेर तालुक्यातील निर्यातक्षम केळीचे उत्पादक विशाल अग्रवाल यांना त्रिची ( तामिळनाडू ) येथील राष्ट्रीय केळी संशोधन संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर दिला जाणारा  उत्कृष्ट केळी उत्पादक शेतकरी हा पुरस्कार जाहीर  झाला आहे. तसेच 'सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान प्रसार प्रिंट मीडिया' हा पुरस्कार येथील पत्रकार दिलीप वैद्य यांना जाहीर झाला आहे.  

त्रिची येथील एका कार्यक्रमात या दोघांना हा पुरस्कार सोमवारी प्रदान केला जाणार आहे. त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन संस्थेचे संचालक डॉ आर सेल्वराजन यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. या संस्थेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 'केळी उत्पादन आणि विपणनातील कृत्रिम बुद्धिमत्ता' या विषयावरील परिसंवाद ही यावेळी आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान आणि उद्योजकता व व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ व्ही पलनि मुथू, कृषी अभियांत्रिकी विभागाचे माजी उपमहासंचालक डॉ के अलगू सुंदरम, कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक डॉ व्ही वेंकट सुब्रमण्यम यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विशाल अग्रवाल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले असून युवा केळी उत्पादक शेतकरी आहेत. ते शेतीत विविध प्रयोग करतात. सध्या केळी निर्यातीवर त्यांचा भर असून त्यांच्यासह परिसरातील अन्य युवा शेतकऱ्यांना सोबत घेत अधिकाधिक निर्यातक्षम केळी उत्पादन आणि निर्यात करण्यावर त्यांचा भर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत बाजारपेठेचा अभ्यास करून अधिकाधिक केळी निर्यात करण्यावर त्यांचा भर आहे. २०१७ मध्ये त्यांनी भारतीय मानक ब्युरो परिषदेत शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले. २०१८ मध्ये इस्राईल येथे अभ्यास दौरा केला, याच वर्षी जळगाव येथील जागतिक केळी परिषदेत सक्रिय सहभाग घेतला. स्वतः केळीचे पॅक हाऊस उभारले, मॅक्स फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली व फिलिपाईन्सचा अभ्यास दौरा करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त केळी कशी निर्यात होईल याबाबत खासगी कंपन्यांची चर्चा केली. श्री वैद्य यांनी केळी या विषयावर सातत्याने लेखन केले आहे.