रावेरला गुणगौरव सोहळा : विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित असल्यास यश हमखास
माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
प्रतिनिधी / रावेर
विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. सातत्याने प्रयत्न केल्याने यश नक्कीच मिळते, शिक्षणाच्या आड कधीच आर्थिक परिस्थिती येत नाही असा विश्वास माजी आमदार अरुण पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात उपस्थित विद्यार्थ्यांना अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना दिला.
रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळातर्फे येथील समाजाच्या मंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर डायटचे माजी प्राचार्य नीळकंठ गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकरी विकास पाटील, मराठा समाज विकास मंडळ अध्यक्ष राहूल पंडित, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निवृत्त उपयुक्त व्ही डी पाटील, अप्पर तहसीलदार मयूर कळसे, उद्योजक श्रीराम पाटील, गोपाळ दर्जी, डॉ एस आर पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याध्यक्ष जे के पाटील, भगवान सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार पुढे म्हणाले कि, समाजातील इतर विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी ऊर्जा मिळावी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा मराठा समाज विकास मंडळाचा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी इतर क्षेत्रांत यश मिळवावे असे आवाहन पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. यावेळी नीलकंठ गायकवाड, विकास पाटील, मयूर कळसे, गोपाळ दर्जी यांनी मार्गदशन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर बी महाजन, व शेखर पाटील यांनी केले. यावेळी मराठा समाज विकास मंडळाचे सर्व संचालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झेंडे देण्यापेक्षा पुस्तके द्या : दर्जी
युवकांच्या भवितव्याचा विचार करून त्यांच्या हाती झेंडे देण्यापेक्षा पुस्तके दिली पाहिजेत , त्यातूनच खरी वैचारिक क्रांती घडू शकेल. समाजाचे संघटन जरूर असले पाहिजे मात्र त्यातून रोजगार, शिक्षण, सहकार्य व्हावे असे मत दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपाळ दर्जी यांनी व्यक्त केले.