विधानपरिषदेत रसलपूर ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी : आ. एकनाथराव खडसे

दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

विधानपरिषदेत रसलपूर ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी : आ. एकनाथराव खडसे

प्रतिनिधी/रावेर

तालुक्यातील रसलपूर येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून या ग्रामपंचायतीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत करणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आ एकनाथराव खडसे यांनी दिली. त्यामुळे या गैरव्यवहारातील खरे चेहरे चौकशीतून जनतेसमोर येणार आहे.

रसलपूर ग्रामपंचायतीला सन २०२२ ते २०२५ या काळात १५ वा वित्त आयोगातून सुमारे साडे तीन कोटींचा निधी मिळाला असल्याची प्रशासकीय माहिती आहे. या निधीचा उपयोग ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी विकास कामासाठी न करता कागदोपत्री कामे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच या निधीतून केलेली कामे निकृष्ट दर्जाची असून या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. येथील ग्रामपंचायतीत संगनमताने आर्थिक गैरव्यवहार झालेला असल्याचा संशय आहे. त्यामुळे सन २०२२ ते २०२५ या काळातील १५ व्या वित्त आयोगातून केलेल्या सर्व कामांची व टाकलेल्या खर्चाच्या बिलांची पडताळणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी करावी अशी मागणी सोमवारपासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत करणार असल्याचे आ एकनाथराव खडसे यांनी सांगितले. या गैरव्यवहारातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात येणार असून यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आ. खडसे यांनी सांगितले. त्यामुळे या गैरव्यवहारातील खरे चेहरे चौकशीतून जनतेसमोर येणार आहे.