मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार : रसलपूर ग्रामपंचायतीच्या चौकशीचे आदेश
पोलीस प्रशासनाकडून गोपनीय चौकशी
प्रतिनिधी / रावेर
तालुक्यातील रसलपूर ग्रामपंचायतीत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल या आज रावेर तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांची भेट घेवून याबाबत तक्रार केली . याची दखल घेवून चौकशी करण्याचे व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
रसलपूर ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण दिवसेंदिवस उघड होत चालले आहे. सन 2022 ते 2025 या काळात 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनीही हा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले आहे. तर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी बी एस आकलडे यांना दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या सिइओ मिनल करणवाल या आज रावेर तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांची भेट घेवून रसलपूर ग्रामपंचायतीतील 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याबाबत माहिती दिली. याची आपण तात्काळ दखल घेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे रसलपूर ग्रामपंचायतीच्या चौकशीतून आर्थिक गैरव्यवहार करणारे खरे चेहरे जनतेसमोर येणार आहे.
पोलीस विभागाकडून गोपनीय चौकशी
दरम्यान, यापूर्वी रावेर पंचायत समितीतील शौचालय घोटाळ्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून यात सुमारे 36 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस विभागातर्फे रसलपूर ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराची गोपनीय माहिती घेतली जात आहे. यात कोणाकोणाचा सहभाग आहे याची प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर आता जिल्हा परिषद व पोलीस प्रशासनाची नजर आहे.

krushisewak 
