रावेरला एसडीआरएफचे पथक तैनात : मंत्रालयाकडून दखल

जिवीत हानी टळणार : तहसीलदारांची माहिती

रावेरला एसडीआरएफचे पथक तैनात : मंत्रालयाकडून दखल

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर 

गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीने तिघांचा मृत्यू झाला असून पुरात वाहून जाणाऱ्या चार जणांना नागरिकांनी वाचवले आहे. याची राज्याच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने (एसडीआरएफ) तात्काळ दखल घेऊन रावेरला राज्य आपत्ती व्यवस्थापन निवारण पथक पाठवले आहे. पुढील आदेश येईल तोपर्यंत हे पथक येथेच राहणार असल्याची माहिती तहसीलदार बंडू कापसे यांनी दिली. 

५ जुलै व १९ जुलैला तालुक्यात तसेच सातपुड्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी नाल्यांना आलेल्या पुरात वाहून गेल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ५ जुलैला झाली आहे. तर १९ जुळला झालेल्या पावसाने आलेल्या पुरात वडगाव, वाघोड येथे प्रत्येकी एक तर अजंदा येथील पुलावरील पुरात दोन जण वाहून जात होते. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने या चौघांना वाचवण्यात यश आले आहे. 

एसडीआरएफचे पथक तैनात 

दरम्यान तालुक्यात घडलेल्या या घटनांची दखल जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नैसर्गिक आपत्ती व मदत कार्य आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी संभाव्य काळासाठी २० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक धुळे येथून रावेरला पाठवले आहे. हे पथक आज गुरुवारी येथे पोहचले आहे. तहसीलदार बंडू कापसे यांनी पथकाशी चर्चा करीत महत्वाच्या सूचना दिल्या.