अखेर अतिक्रमण धारकांना नोटीस : रावेरातील जुना सावदा रोडवरील अतिक्रमणावर कारवाईची तयारी ; बांधकाम ठिकाणी चिटकवल्या नोटीस

आठ दिवसांचा अल्टीमेटम

अखेर अतिक्रमण धारकांना नोटीस : रावेरातील जुना सावदा रोडवरील अतिक्रमणावर कारवाईची तयारी ; बांधकाम ठिकाणी चिटकवल्या नोटीस

प्रतिनिधी /रावेर :

रावेर शहरात जुना सावदा रोडवर शासकीय जागेत सुरु असलेल्या 20 दुकानावर अखेर आज जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगरला. उप विभागीय अभियंता आर पी इंगळे यांनी या ठिकाणी जाऊन नोटीस चिटकवल्या आहेत. आठ दिवसाचा अतिक्रमण धारकांना अल्टीमेटम दिला असून त्यानंतर विभागातर्फे अतिक्रमण काढण्याची तयारी केली जाणार आहे.

येथील जुना सावदा रोडवर सुरु असलेल्या 20 दुकानांचे बेकायदेशीर आरसीसी अतिक्रमण थांबवण्यासाठी नगर पालिका आणि जिल्हा परिषद प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत या दोन्ही विभागांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करण्याचे ठरवले आहे. जिल्हा परिषदेचे उप विभागीय अभियंता आर पी इंगळे यांनी आज सर्व अतिक्रमण सुरु असलेल्या बांधकामावर नोटीस चिकटवल्या आहेत. यात हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून बांधकाम करणाऱ्यांनी त्यांच्याकडे या जागेबाबत मालकीचे कागदपत्र असल्यास ते आठ दिवसात या कार्यालयाकडे सादर करावेत.तोपर्यंत सदर बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे. मुदतीत कागदपत्र सादर न केल्यास शासकीय कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा परिषदने केलेल्या कारवाईचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. 

रावेर शहरात जुना सावदा रोडने सुरू असलेल्या अतिक्रमणाची समस्या गंभीर बनली आहे. शासकीय जमिनीवर व्यावसायिक गाळे तयार करून परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने काही अज्ञात व्यक्ती काम करत आहेत. रोडटच असलेल्या करोडो रुपयांच्या शासकीय जमिनीवर तयार केलेले हे गाळे विक्री करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी खात्रीलायक माहिती माध्यमांकडे आहे. या अतिक्रमणामुळे जनतेत तीव्र संताप असून त्वरित कारवाईची मागणी होत आहे. या बाबतीत माध्यमांनी रावेर नगर पालिका आणि जिल्हा परिषद अतिक्रमण विरोधी विभागाची प्रतिक्रिया घेतली असता, येत्या काही दिवसांत संयुक्तरित्या कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. इतरही अतिक्रमणकडे लक्ष द्यावे रावेर शहरातील मुख्य रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. नगर पालिकेने नागरिकांसाठी तयार केलेल्या पादचारी मार्गावर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. स्टेशन रोड, उटखेडा रस्ता आणि इतर अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे शहराचे रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांनी नगर पालिकेला इतर अतिक्रमणांवर देखील लक्ष देण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक जागांचे अतिक्रमण थांबवून नागरिकांना मोकळे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. येत्या काही दिवसांत होणारी कारवाई जनतेच्या अपेक्षांवर कितपत उतरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अतिक्रमण धारकांची गुप्त बैठक 

दरम्यान, बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींची मंगळवारी गुप्त बैठक झाली. मात्र या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही