रावेर शहरात चोरट्यांचा हैदोस : एकाच रात्री चार दुकाने फोडली : चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रावेर/ प्रतिनिधी
रावेर शहरातीचा मध्यवर्ती भाग असलेल्या महात्मा गांधी चौक परिसरात गुरुवारी रात्री चोरट्यांनी तब्बल चार दुकाने फोडली. तीन दुकानातून ऐवज चोरट्यांनी लांबवला असून एका दुकानात चोरीचा चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरला. आज सकाळी या घटना उघडकीस आल्यानंतर गांधी चौकात नागरिकांची गर्दी झाली होती.किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. चोरीच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहराच्या गजबजलेल्या व मध्यवर्ती भागात एकाच रात्री चोरट्यांनी चार दुकाने फोडली. यात तीन दुकानातून ऐवज चोरून नेण्यात चोरट्यांना यश आले. मात्र एका दुकानात चोरी होऊ शकली नाही. गांधी चौकातील महेंद्र ताराचंद्र लोहार यांच्या न्यू मनोज जनरल स्टोअर्सचे कुलूप तोडून चोरी झाली. तर शेख सादिक यांच्या युनिक किराणा स्टोअरचे शटर वाकवून चोरी करण्यात आली आहे.याच भागातील भूषण कोळी यांच्या महादेव मेडिकल'चे कुलूप तोडून चोरीची घटना झाली. शरीफ पन्नीवाले यांच्या दुकानाचे केवळ कुलूप तोडले. मात्र चोरी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी ही माहिती समजताच परिसरात नागरिकांची एकच गर्दी केली होती. रात्री पोलिसांची गस्त असतांना शहराच्या मध्यवर्ती भागात एकाच रात्री चार चोरीच्या घटना पोलिसांच्या गस्त पथकाच्या कार्य पद्धतीवर शंका निर्माण करणारी आहे.पोलिसांनी या सर्व चोरीच्या घटनांची चौकशी सुरू केली असून चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे. पोलिसांनी रात्री गस्त वाढवल्यास चोरीच्या घटनांना प्रतिबंध होईल.
रात्री वाळू माफियांचा वावर
मध्यरात्री वाळू माफियांचा दुचाकीवर शहरात मुक्तपणे वावर सुरु असतो. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत.रात्री चालणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनीकारवाईचे सत्र सुरु केल्यास वाळू माफियांचा वावर आपोआपच बंद होईल.