यशोगाथा : पिंप्रीनांदू येथील किशोर चौधरी यांचा टरबूजात पपईचा आंतरपीक लागवडीचा प्रयोग
दरवर्षी ३५ एकरवर जैन टिश्युकल्चर केळी रोपांची लागवड
कृष्णा पाटील/ रावेर
शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत केळी उत्पादनात हातखंडा असलेल्या पिंप्रीनांदू ता. मुक्ताईनगर येथील किशोर भगवान चौधरी यांनी केळीचे उत्पादन घेताना विविध अंतरपिकांचा प्रयोग करीत शेतीचा पोत कायम राखला आहे. टरबूज पिकात पपईचे अंतरपीक म्हणून उत्पादन घेण्याचा त्यांचा सध्या सुरु असलेला प्रयोग यश पुर्तीकडे गेला आहे. लागवड केलेल्या ४५०० पपई रोपांपासून त्यांना एक वर्षभरात किमान ४५ लाखांचे उत्पादन मिळण्याची अंदाज आहे. केळी पट्ट्यात पिक पद्धतीत होत असलेल्या बदलाचे हे उदाहरण आहे.
पिंप्रीनांदू गावाला लाभलेला तापी नदीचा किनारा, त्यामुळे शेतीसाठी पाण्याची मुबलक उपलब्धता, गावच्या शेती शिवारातील असेलेली काळी कसदार जमीन व अपर मेहनत करणारा शेतकरी यामुळे गावाला सधनतेचा व समृध्तेचा वारसा लाभलेला आहे. येथीलच किशोर भगवान चौधरी यांच्या एकत्रित कुटुंबाची सुमारे ९० एकर शेती आहे. यात केळी पिकासह कापूस, तूर, मका, हरबरा, तीळ टरबूज, पपई असा पिकांचे ते उत्पादन घेतात. पिक पद्धतीत बदल व पिकांची फेरपालट यावर किशोर चौधरी यांचा विशेष भर आहे.
केळी लागवडीसाठी जैन टिश्युकल्चरचा वापर
पिंप्रीनांदू येथील किशोर चौधरी हे सधन केळी उत्पादक म्हणून या परिसरात व मुक्ताईनगर तालुक्यात सुपरिचित आहेत. दरवर्षी सुमारे ९० एकर शेती कसून ते विविध पिकांचे उत्पादन घेतात. त्यापैकी ३५ एकरवर ते निव्वळ केळीचे उत्पादन घेतात. केळीचे उत्पादन घेत असताना दरवर्षी केल्या जाणाऱ्या ६० हजार खोडांच्या लागवडीसाठी जैन टिश्यूकल्चर रोपांना त्यांचे प्राधान्य असते. तसेच संपूर्ण शेती सिंचनाखाली असून प्रत्येक पिकाला ठिबक सिंचनाचा वापर करीत असल्याने पाण्यात बचत होण्याबरोबरच पिकांच्या येणाऱ्या उत्पादनांत वाढ झाली असल्याचे श्री चौधरी सांगतात.
टरबूजात पपई लागवडीचा प्रयोग
केळीचे उत्पादन घेत असतना किशोर चौधरी यांनी शेतीत विविध प्रयोग करीत त्यात यश मिळवले आहे. त्यांनी स्वत केलेले प्रयोग इतर शेतकऱ्यासाठी मार्गदर्शक ठरावे असेच आहेत. या वर्षी त्यांनी पाच एकरवर टरबूजाची लागवड करीत पिक पद्धतीत बदल घडवून आणला होता. योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्याने त्यांना टरबूजाचतून एकरी ३० टन उत्पादन मिळाले. यातून त्यांना ३ लाखांचे उत्पन्न झाले. टरबूजाचे उत्पादन घेतल्यावर याच ठिकाणी तयार असलेल्या बेडवर पपईची लागवड केली. यासाठी मल्चिंग व ठिबकचा वापर केला आहे. पपई लागवडीसाठी त्यांनी एकॉसीन अग्रोटेक या कंपनीच्या १५ न या वाणाच्या ४५०० रोपांची फेब्रुवारी अखेर लागवड केली आहे.
१५ सप्टेबरनंतर हार्वेस्टिंगला सुरुवात
सध्या पपईचे पिक हार्वेस्टिंगच्या अवस्थेत असून येत्या पंधरा दिवसात हार्वेस्टिंगला सुरुवात होईल असा अंदाज किशोर चौधरी यांनी व्यक्त केला. हि हार्वेस्टिंग साधारण पाच महिन्यापर्यंत चालणार आहे. दर आठव्या दिवशी हार्वेस्टिंग केले जाणार असून यातून सुमारे १२ ते १४ टन उत्पादन मिळेल असा अंदाज श्री चौधरी यांनी व्यक्त केला आहे. पपई उत्पादनाचा एकूण खर्च तीन लाखापर्यंत असून यातून प्रती झाड १००० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. म्हणजेच पाच एकरवरील पपई लागवडीतून सुमारे ४५ लाख रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज शेतकरी किशोर चौधरी यांनी व्यक्त केला .
आधुनिक यंत्रांचा वापर
शेती करीत असताना मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज भासते. मात्र मजुरांची टंचाई जाणवत असल्याने व वेळीच मशागतीसह इतर कामे करण्यासाठी श्री चौधरी यांनी शेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिली. मशागतीसाठी त्यांच्यकडे मोठे व लहान ट्रॅक्टर आहेत. तसेच रोटाव्हेटर, डिशहारो, पेरणी यंत्र, नांगर, टिलर, पॉवर टिलर, थ्रेशर आदि यंत्रांचा ते वापर करतात.
१०० टक्के ठिबकचा वापर
पिंप्रीनांदू परिसरात तापी नदीमुळे पाण्याची टंचाई नसली तरी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा पुरेपूर प्रयत्न श्री चौधरीकडून केला जातो. यासाठी त्यांच्यकडे असलेली संपूर्ण ९० एकर शेती त्यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ओलिताखाली आणली आहे. याशिवाय पाण्याचे बाष्पीभवन कमी व्हावे यासाठी पिकांची लागवड करताना ते ल्माल्चींग पेपरचा वापर करतात.
एकाच पिकाच्या मागे न लागता पिक पद्धतीत बदल केल्यास जमिनीचा पोत खराब न होता जमिनीची सुपीकता टिकून राहते. शेतीला इंडस्ट्री समजून नियोजन केल्यास शेतीतून हमखास नफा मिळतो.
--- किशोर भगवान चौधरी, शेतकरी पिंप्रीनांदू (मुक्ताईनगर जि जळगाव) मो ९७३०२५६५२५