आमदार अमोल जावळे यांचा पहिला मास्टरस्ट्रोक : रावेर सावदा रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण काढले
नागरिकांकडून समाधान व्यक्त
प्रतिनिधी / रावेर
रावेर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांनी पहिला मास्टर स्ट्रोक अतिक्रमणा विरुद्ध मारला असून रावेर-सावदा रस्त्यावर होणारे बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे रावेर शहरात समाधान व्यक्त होत आहे.
रावेर-सावदा महामार्गावर नवीन विश्रामगृहासमोर काही व्यक्तींनी बेकायदेशीर अतिक्रम केले होते. याबाबत नागरिकांनी संबधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष करीत अतिक्रमण करणाऱ्यांना अभय दिले होते. रावेर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांच्याकडे नागरिकांनी याबाबत समस्या मांडून हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली. याची तात्काळ आमदार जावळे यांनी दखल घेवून संबधित विभाग, नगरपालिका व पोलीस प्रशासनाला सदरचे अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या. याची प्रशासनाने दखल घेवून जेसीबीच्या सहाय्याने सदर जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. याबद्दल आमदार अमोल जावळे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीचे नागरिकांनी कौतुक केले आहे. रावेर शहरातील अतिक्रमणाचा प्रश्नही मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.