रावेरला शेतकरी आक्रमक : तळोदा-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गला शेतकऱ्यांचा विरोध : भुसंपादनाची प्रक्रिया थांबविण्याची शेतकऱ्यांच्या बैठकीत मागणी
पूर्वीचा महामार्ग सोयीचा

प्रतिनिधी/ रावेर
तळोदा बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गासाठी शासनाने भुसंपादनाची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी जात असून हे शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गांवर आहे. त्यामुळे या महामार्गला रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समितीत या शेतकऱ्यांची बैठक झाली असून महामार्गासाठी आम्ही जमिनी देण्यास तयार नाही असा ठराव बैठकीत शेतकऱ्यांनी केला आहे.
नियोजित तळोदा-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गची भुसंपादनाची प्रक्रिया शासनाकडून सुरु आहे. यात भाटखेडा, रावेर, करजोद, पातोंडी, नांदूरखेडा, पुनखेडा, तमासवाडी, खिरवड, वाघोड, मोरगाव, बुद्रुक, मोरगाव खुर्द, अटवाडे, अजनाड, खानापूर, चोरवड या गावांच्या शेती शिवरातून हा महामार्ग जात आहे. यात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी नष्ट होणार आहेत. तसेच महामार्गमुळे जमिनीचे विभाजन, होऊन तुकडे पडणार आहेत. अनेक अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी यात जाणार असल्याने शेतकरी भूमिहीन होतील. भविष्यात त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या महामार्गात शेतजमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गावांच्या शेत शिवारातून होणाऱ्या भुसंपादनाची प्रक्रिया त्वरित थांबविण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी बैठकीत केली.
महामार्गाला विरोध नाही : पूर्वीच्या रस्त्याने करावा
पूर्वीचा अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग रावेर शहरातून व तालुक्यातून गेलेला आहे. यामुळे कोणाचेही नुकसान होणार नसल्याने नव्याने प्रस्तावित असलेला तळोदा-बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय महामार्ग पूर्वीच्या महामार्गाने न्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शासनाकडून सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी बैठकीत शेतकऱ्यांनी केली आहे. या बैठकीला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, भागवत पाटील, रामदास पाटील, पुंडलिक तुकाराम पाटील(तमासवाडी) सुरेश चिंधु पाटील, एड आर आर पाटील, अनिल पाटील (तामसवाडी),विकास पाटील(पुनखेडा), एड धीरज पाटील(पुनखेडा), आर जी पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर शेतकरी उध्वस्त होतील
पूर्वीचा अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा महामार्ग सोयीचा आहे. याचे चौपदरीकरण केल्यास शेतजमिनीचे फारसे नुकसान होणार नाही. मात्र सध्या प्रस्तावित असलेल्या महामार्गासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. यामुळे शेकडो शेतकरी उध्वस्त होतील.
अनिल पुंडलिक पाटील, शेतकरी( तामसवाडी).