रावेर आगारात कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार : हात दाखवूनही प्रवाशांना न घेताच बसचा सुसाट प्रवास

विभागीय नियंत्रकांनी दखल घेण्याची प्रवाशांची मागणी

रावेर आगारात कर्मचाऱ्यांचा मनमानी  कारभार : हात दाखवूनही प्रवाशांना न घेताच बसचा सुसाट प्रवास

प्रतिनिधी/रावेर

एस टी महामंडळाच्या रावेर आगाराचा कारभार कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे कुचकामी ठरला असून आगाराच्या व्यवस्थपकांचे कर्मचाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाच्या वागणुकीमुळे अनेक प्रवाशी त्रस्त झाले आहेत. याची विभागीय नियंत्रकांनी दखल घेवून कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

एकेकाळी रावेर अगराचा उत्पन्नाच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांक होता. मात्र वाढती खासगी वाहनांची संख्या व अवैध प्रवासी वाहतूक यामुळे अगार लयाला गेले आहे. रावेर आगारातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार प्रवाशांसाठी रोजची डोकेदुखी ठरला. यामुळे प्रवाशी वर्ग महामंडळाच्या बसमधून प्रवास करण्यापेक्षा खासगी वाहनांचा आधार घेवू लागले आहेत. प्रवाशांनी हात दाखवूनही रिकाम्या बस असतानाही थांबविल्या जात नाहीत. तर आगाराने निर्धारित केलेल्या वेळेबाबत चालक व वाहांकमध्ये फारसे गांभीर्य दिसून येत नाही. महिला प्रवाशांशी उर्मटपणे बोलणे, स्वतःला वाटेल तिथे व पाहिजे तेवढा वेळ बस उभी करून ठेवणे, प्रवाशांनी हात दाखवूनही बस उभी न करणे, निर्धारित केलेल्या वेळेपूर्वी बस मार्गस्थ करणे, या चालकांच्या तक्रारी प्रवाशांकडून दररोज होत आहेत. मात्र याकडे बेशिस्त वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आगार व्यवस्थापकांचे लक्ष दिसून येत नाही. किंवा या कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही असेच म्हणावे लागेल.प्रवाशी न घेता अनेक चालक सुसाट गाड्या पळवत असून पर्यायाने एस टी महामंडळाचे आर्थिक नुकसान करीत आहेत.

 गेल्या वर्षभरात तत्कालीन आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवांजारी यांनी बेशिस्तपणे वागणाऱ्या थेट कारवाईचा बडगा उगारत कर्मचाऱ्यांना लगाम लावला होता. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू झाली आहे. आगार व्यवस्थापक विजय पाटील यांनी यात लक्ष घालून कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे द्यावेत अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.