पोलिसांच्या रडारवर वाळू माफिया : अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी तीन गुन्हे दाखल : तीन ट्रॅक्टर जप्त
पोलीस पथकाची कारवाई
प्रतिनिधी / रावेर
रावेर परिसरात रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणावर अवैध गौण खनिजाची वाहतूक करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्याविरुद्ध पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी कारवाईचा दंडूका उगारला आहे. बेकायदेशीरपणे रात्रीच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक करणारे वाळू माफिया आता पोलिसांच्या रडारवर आहेत.
रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावात गावठी हातभट्टीवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. दोन दिवसात नेहेता, दोधे, व पाडला परिसरातील गंगापूरी धरणाजवळ हातभट्टीवर धाड टाकून या घटनामध्ये सुमारे 37 हजाराची गावठी दारू नष्ट केली आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी गस्त घालत असतांना वाळूचे ट्रॅक्टर बिनबोभाटपणे अवैध वाळूची वाहतूक करताना आढळून आले आहे. शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास नेहेता गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. याप्रकरणी विना परवाना बेकायदेशीर पणे वाळूची रात्री वाहतूक केल्यामुळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळूची वाहतूक करणारे लाल रंगाचे सोनालिका ट्रॅक्टर क्रमांक MH- 32-P-1708, निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH-19-AP-8809 व तिसरे निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे सोनालिका ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. हे तिन्ही ट्रॅक्टर रात्री वाळूची वाहतूक करताना आढळून आले होते. ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोज महाजन पोलीस कर्मचारी सचिन घुगे, प्रमोद पाटील, महेश मोगरे, नितीन सपकाळे, चैतन्य नारखेडे यांच्या पथकाने केली आहे.
कारवाई तर होणारच : डॉ जयस्वाल
रावेर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कायम शांतता कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. कुणीही कायद्याचे, नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रात्रीच्या वेळी वाळूची तसेच गौण खनिज वाहतूक खपवून घेतली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी सांगितले. यामुळे वाळू माफिया आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.