रावेर तालुक्यात अवकाळीने महिनाभरात 50 कोटींचे नुकसान : नुकसानग्रस्तांच्या आर्थिक मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : आमदार अमोल जावळे
नुकसानीचा अहवाल वरिष्ठांना रवाना

प्रतिनिधी / रावेर
रावेर तालुक्यात १२ एप्रिल ते ११ मे दरम्यान तीन वेळा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. यामुळे तालुक्यातील ५४ गावातील १८३७ शेतकऱ्यांचे ११३४ हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले आहे. अंदाजे ५० कोटी ३९ लाख ४९ हजार रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी व महसूल विभागाने वर्तवला आहे. मात्र नुकसानीचा हा आकडा प्रत्यक्षात ७५ कोटींच्या घरात जाण्याची श्यक्यता आहे. नुकसानीची पाहणी आमदार अमोल जावळे, तहसीलदार बी ए कापसे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी केली असून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार जावळे शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत.
१२ एप्रिलला वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने १९ गावातील ७३२ शेतकऱ्यांचे २२ कोटी ६६ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. यात ५१० हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले होते. त्यांनतर ६ मे रोजी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने याचा फटका २९ गावातील ८८४ शेतकऱ्यांच्या पिकाला बसला होता. यात ५१९ हेक्टरवरील पिकांचे २३ कोटी६ लाख ४३ हजार रुपयांचे नुकसान झाले होते. पुन्हा पाच दिवसानंतर ११ मे रोजी ६ गावातील १०५ हेक्टरवरील २२१ शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने ४ कोटी ६६ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
महिनाभरात ५० कोटींच्यावर नुकसान
१२ एप्रिल ते ११ मे याकाळात तीन वेळा झालेल्या अवकाळी पावसाने रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ५० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.कापणीला आलेली केळी वादळामुळे जमीनदोस्त झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम तोंडावर असून यासाठी पैसे कुठून आणावे असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.
आमदारांचे मदतीसाठी प्रयत्न
नुकसानग्रस्त भागातील शेतीशिवाराला आमदार अमोल जावळे, तहसीलदार बी ए कापसे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी भेट देवून पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून ते आर्थिक मदतीसाठी वरिष्ठांना पाठविण्यात आले आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार अमोल जावळे प्रयत्नशील असून त्यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे.
----अमोल जावळे, आमदार- रावेर