कारवाईचा दणका : हतनूर कालव्यालगत अवैध माती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर मध्यरात्री कारवाई : सावदा पोलीस ठाण्यात एका ट्रक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
पळून गेलेल्या वाहनांचा पोलिसांतर्फे शोध जारी

प्रतिनिधी/ रावेर
हतनूर कालव्यालगत वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध मातीचे उत्खनन व वाहतूक सुरु होती. याबाबतचे वृत्त कृषीसेवक न्यूज पोर्टलने प्रकाशित करीत संबधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री हतनूर कालव्यालगत मातीचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांविरुद्ध मोहीम उघडण्यात आली. यावेळी स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच-१९- इए-१०२७ या ठिकाणी अवैधरीत्या माती भरताना आढळून आल्याने या वाहनाविरुद्ध कारवाई करीत सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाळू व माती माफियांमध्ये खळबळ उडाली असून आज कालवा परिसरात शुकशुकाट आहे.
पळून गेलेल्या जेसीबीसह ट्रॅक्टरचा शोध जारी
दरम्यान मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हतनूर प्रकल्पाचे व सिंचन विभागाचे अधिकारी गस्त घालत असताना कालव्यालगत एका जेसीबीने मातीचे खोदकाम सुरु होते. तर वाहतुकीसाठी सहा ते सात ट्रॅक्टर आढळून आले. मात्र कारवाईचे पथक समोरून येताना दिसताच जेसीबीसह सहा ट्रॅक्टर पळून गेले. यावेळी पथकाने निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे एमएच-१९- इए-१०२७ क्रमांकाचे एक ट्रक्टर ताब्यात घेतले आहे. या वाहनावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. तर पळून गेलेल्या वाहनांचा शोध पोलिसांतर्फे जारी आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
कारवाईनंतर आज शुकशुकाट
रात्री गस्ती पथकाने केलेल्या कारवाईनंतर कालव्यालगत माती माफियांनी आज फिरकून ही पाहिलेले नाही आज शुकशुकाट दिसून येत असून या परिसरातील शेतकऱ्यांनी झालेल्या कारवाईचे स्वागत केला आहे.
हतनूर कालव्यालगत भरावाच्या मातीचे अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणाची शेतकरी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार करणार असून कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.