बियाण्यांची लिंकिंग पद्धतीने विक्री : आमदार लता सोनवणे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
जळगाव /प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा जाणवत असून कृषी केंद्र चालक लिंकिंग पद्धतीने शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करीत असल्याची तक्रार चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच जादा दराने बियाण्यांच्या होणाऱ्या विक्रीची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. तर काही कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे लिंकिंग पद्धतीने विक्री करीत आहेत. इतर कंपन्यांचे बियाणे पाकीट घेण्याबाबत शेतकऱ्यांना बंधनकारक केले जात आहे. ते न घेणाऱ्या शेतकऱ्यांना जादा दराने बियाण्यांच्या पाकिटांची विक्री केली जात आहे. चोपडा मतदार संघ मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने या भागात बोगस बियाण्यांची तसेच लिंकिंग पद्धतीने बियाण्याची विक्री होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी अशी मागणी आमदार लता सोनवणे यांनी केली आहे.