हिवाळी अधिवेशनातून : केळीच्या निर्यातीला चालना व टिश्युकल्चरला अनुदान द्यावे : आ. अमोल जावळे यांची मागणी

केळी विकास महामंडळ स्थापनेच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर

हिवाळी अधिवेशनातून : केळीच्या निर्यातीला चालना व टिश्युकल्चरला अनुदान द्यावे : आ. अमोल जावळे यांची मागणी

प्रतिनिधी I रावेर

केळी निर्यात क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. आधुनिक केळी निर्यात सुविधा केंद्रे  उभारण्यासह निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी स्कर्टिंग बॅग्स, बड इंजेक्शन आणि टिश्यूकल्चर रोपे यावर शासनाने अनुदान द्यावे  अशी मागणी आमदार अमोल जावळे त्यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे. यामुळे केळी उत्पादकांना आर्थिक बळ मिळून जळगाव जिल्ह्याची निर्यात क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या आमदार जावळे यांनी मांडल्या. भारताचा सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, दर्जेदार केळी उत्पादन करूनही गेल्या काही काळापासून अत्यल्प बाजार भावामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. शेतमाल मातीमोल दरात विकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी या मागण्या शासनाकडे केल्या आहेत.

केळी महामंडळस्थापनेचा ऐरणीवर

यासोबतच केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या केळी महामंडळस्थापनेचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न देखील आमदार जावळे यांनी यावेळी अधिवेशनात मांडला. या महामंडळासाठी प्रस्तावित असलेला १०० कोटी रुपयांचा निधी तातडीने निर्गमित करावा. जेणेकरून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहचेल हा मुद्दा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. केळी उत्पादन, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि बाजार व्यवस्थापनासाठी हे महामंडळ अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

संशोधनासाठी उपाययोजना

याशिवाय जिल्ह्यातील केळी पिकावर करपा व इतर रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने करपा निर्मुलनासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी करपा नियंत्रणासाठी स्वतंत्र करपा पॅकेजजाहीर करावे. तसेच केळीत दिसणारी चिलिंग इंज्युरी कमी करण्यासाठी तातडीने संशोधन करून शेतकऱ्यांना त्याचे मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काँग्रेस गवताचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. यासाठी कॉंग्रेस गवताचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करून प्रभावी उपाययोजना राबवणे अत्यावश्यक असल्याचे आमदार अमोल जावळे यांनी यावेळी स्पष्ट केले.