जैन टिश्यूकल्चर रोपांच्या ६ हजार खोड लागवडीतून वर्षभरात सात लाखांचा नफा
बोरखेड्याच्या युवा शेतकऱ्याने शेतीत केला बदल
कृष्णा पाटील / रावेर
बोरखेडा हे रावेर शहरापासून केवळ दीड किलोमीटरअंतरावर असलेले अंदाजे ५५० लोकसंख्येचे गाव. गावातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. सामाजिकदृष्ट्या एकोपा असलेल्या या गावातील अरुण शांताराम पाटील या युवकाने वडिलोपार्जित शेतीत आधुनिक तंत्राला अवगत करीत बदल केला. त्याचा परिणाम केळीचे विक्रमी उत्पादन त्यांना मिळाले. गेल्या वर्षी सहा हजार खोडांची जैन टिश्यूकल्चर रोपांची त्यांनी लागवड करीत साडेदहा लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
कृषी पदविकेचे शिक्षण घेतलेल्या अरुण पाटील यांना शेतीची लहानपणापासूनच आवड होती. कृषी पदविका असल्याने सरकारी तसेच खासगी क्षेत्रात नोकरी सहज मिळण्याची शक्यता असताना त्यांनी शेतीचा मार्ग निवडला. २००९ पासून गेल्या १४ वर्षांपासून ते शेती करीत आहेत.
शेतीसाठी दररोज ५५ किमीचा प्रवास
अरुण पाटील यांचे बोरखेडा गाव असले तरी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे वास्तव्य रावेर शहरात आहे. तर त्यांची शेती बऱ्हाणपूर जिल्ह्यात कालापाट या गावात आहे.त्यांची स्वतःची साडे नऊ एकर तर भाडेपट्ट्याची तीन एकर अशी सुमारे साडे बारा एकर शेती कालापाट येथे आहे. रावेर ते कालापाट हे अंतर ५५ किलोमीटर आहे. मात्र अरुण पाटील हे दररोज येऊनजाऊन ११० किलोमीटरचा प्रवास करून शेती करतात.
केळी लागवडीसाठी जैन टिश्यूला प्राधान्य
साडे बारा एकरपैकी दरवर्षी पाच एकरवर ते केळीची लागवड करतात. केळीच्या लागवडीसाठी ते जैन टिश्युकल्चर रोपांचा वापर करतात. त्यांनि लागवड केलेल्या केळीचे योग्य व्यवस्थापन केल्याने त्यांच्या केळीवर सीएमव्ही रोगाचा फारसा प्रादुर्भाव झाला नव्ह्ता. तर उर्वरित क्षेत्रात कापूस व मका पिकाचे उत्पादन घेतले जाते.
६ हजार खोडांची लागवड : ७ लाखांचा नफा
अरुण पाटील यांनी गेल्या वर्षी सहा जैन टिश्यूकल्चरच्या सहा हजार खोडांची लागवड केली होती. दररोज ११० किमीचा प्रवास करून त्यांनी लागवड केळीकडे विशेष लक्ष दिले. वर्षभर खत व फर्टिगेशन व्यवस्थापनाचे योग्य नियोजन केले. त्यामुळे त्यांना २२ ते २५ किलोची रास मिळाली. हि केली त्यांनी बऱ्हाणपूर मार्केटला विकली. सहा हजार खोडांपासून त्यांना साडे दहा लाखांचे उत्पादन मिळाले. साडे तीन लाख रुपये उत्पादन खर्च वजा जाता त्यांना गेल्यावर्षी एकट्या केळी पिकातून सात लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे असे अरुण पाटील सांगतात.
शंभर टक्के ठिबक सिंचनाचा वापर
त्यांच्या शेतात सिंचनासाठी दोन विहिरी व एक कूपनलिका आहे. संपूर्ण शेती ओलिताखाली असून पिकांचे अधिक उत्पादन घेताना पाण्याची बचत व्हावी यावर अरुण पाटील यांचे विशेष लक्ष आहे. त्यासाठी ते ठिबक सिंचनाचा वापर करतात.
आधुनिक यंत्रांचा वापर
शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरवरील नांगर, रोटाव्हेटर, सरीफाळ, मळणीयंत्र यासारख्या यंत्रांचा वापर करतात. त्यांच्याकडे दररोज ५ ते ८ मजुरांना रोजगार मिळला आहे.
सामाजिक क्षेत्रातही योगदान
अरुण पाटील कृषी पदविका असल्याने त्यांना विविध खतांची बियाणे व कीटकनाशकांची माहिती आहे. ते इतर शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. तसेच सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतो. कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शासनाच्या वतीने त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांचे कृषी केंद्र असून ते बोरखेडा गावाचे पोलीस पाटील म्हणून जबाबदारी निभावत आहेत. असे असताना उत्कृष्ट पद्धतीने ते शेतीही करतात .
कृषीसेवकमधून मिळते माहिती
गेल्या सात वर्षांपासून अरुण पाटील साप्ताहिक कृषीसेवकचे नियमित वाचक आहेत. विविध पीक लागवडीची, केळीच्या व्यवस्थापनाची त्यांना या वृत्तपत्रातून माहिती मिळते असे त्यांनी सांगितले. तसेच कृषी मेळावे, कृषी प्रदर्शन, परिसंवाद या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित राहतात.
" लागवडीसाठी निरोगी व सशक्त बेणे, लागवडीनंतर योग्य खत व पाणी व्यवस्थापन, तसेच पिकाच्या प्रत्येक अवस्थेत काळजी घेतल्यास नक्कीच नफा मिळतो. शेतीकडे एक उद्योग म्हणून पहिले पाहिजे, तरच शेतीचा उद्योग नफ्यात येऊ शकतो."
-----अरुण शांताराम पाटील शेतकरी, बोरखेडा ता रावेर जि जळगाव मो. ९४२३१८९३४५