मित्रांच्या कारला सावदा-पिंपरूड रस्त्यावर भीषण अपघात : तिघा मित्रांचा जागीच मृत्यू ; तीन जण गंभीर : एकाची प्रकृती चिंताजनक

आमदार अमोल जावळे अपघातग्रस्त कुटुंबियांच्या संपर्कात : जखमींची डॉक्टरांनीकडून केली विचारपूस

मित्रांच्या कारला सावदा-पिंपरूड रस्त्यावर भीषण अपघात : तिघा मित्रांचा जागीच मृत्यू ; तीन जण गंभीर : एकाची प्रकृती चिंताजनक

रावेर / प्रतिनिधी

भुसावळकडून रावेरकडे येणाऱ्या मित्रांच्या कारला पिंपरूड-सावदा रत्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून एकाचा जळगाव येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर कारमधील आणखी तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.  दरम्यान अपघाताची माहिती मिळताच मध्यरात्रीपासून आमदार अमोल जावळे यांनी मृतांच्या व जखमींच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना धीर दिला आहे . या अपघातात जखमीवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांशी श्री जावळे यांनी संपर्क साधून जखमींची विचारपूस करीत उपचाराबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या घटनेने रावेर परिसरावर शोककळा पसरली आहे.

गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास भुसावळकडून रावेरला येणाऱ्या होंडा सिटी कार क्रमांक एमएच -२० सीएच-८००२ या कारने पिंपरूड ते सावदा दरम्यान एका निंबाच्या झाडाला धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या भीषण अपघातात रावेर येथील शुभम सोनार, मुकेश रायपूरकर व जयेश भोई या तिघा मित्रांचा मृत्यू झाला असून विजय जाधव, गणेश भोई व अक्षय उन्हाळे हे तिघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. कारमध्ये सहा जण असल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेने रावेर परिसरात शोककळा पसरली आहे.  अपघातात ठार झालेला मुकेश रायपूरकर याचा वाढदिवसाच्या दिवशीच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सावदा पोलीस ठाण्यात सुरु आहे.