नाराजी दूर करण्याचा प्रयत्न : आजीमाजी आमदारांमध्ये एका तास चर्चा : आमदार शिरीष चौधरींनी घेतलेल्या भेटीत माजी आमदार अरुण पाटील यांची नाराजी दूर झाली का ?
भावी काळात चुका होणार नाहीत : शिरीष चौधरी
प्रतिनिधी / रावेर
जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील यांचा पराभव झाला होता. या झालेल्या पराभवाला माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार शिरीष चौधरी हे कारणीभूत असल्याची भावना अरुण पाटील यांची आहे. तर बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार चौधरी यांनी सोयीची भूमिका घेतल्याने माजी आमदार अरुण पाटील तेव्हापासून नाराज आहेत. आमदार शिरीष चौधरी व माजी मंत्री एकनाथराव खडसेंबाबत असलेली नाराजी श्री पाटील यांनी अनेकवेळा कार्यकर्ते मेळावे व माध्यमासमोर उघडपणे व्यक्त केली आहे. मराठा समाजाचे नेते असलेल्या माजी आमदार अरुण पाटील यांची नाराजी या निवडणुकीत शिरीष चौधरीना परवडणारी नाही. त्यामुळे माजी आमदार अरुण पाटील यांच्या रावेर येथील संपर्क कार्यालयात आमदार शिरीष चौधरी यांनी आज रात्री प्रत्यक्ष भेट घेत चर्चा करीत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. झालेल्या चर्चेची माहिती घेण्यासाठी माजी आमदार श्री पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याने संपर्क होऊ शकला नाही. तर अनावधानाने गतकाळात काही चुका घडल्या असून भाविकाळात याबाबत काळजी घेऊ अशी ग्वाही दिल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिल्याची माहिती कृषिसेवकला दिली .
20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून उभे आहेत. पुत्राला निवडून आणण्यासाठी आमदार श्री चौधरी यांनी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरु केले आहेत. रावेर विधानसभा मतदार संघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. सुमारे 50 हजारापर्यंत मतदार असलेल्या या समाजाचे अरुण पाटील हे वजनदार नेते आहेत. त्यांना मानणारा सर्व मोठा वर्ग आहे. मात्र गेल्या पाच वर्षात घडलेल्या राजकीय घटनामुळे माजी आमदार अरुण पाटील नाराज होते.आमदार चौधरींनी त्यांची भेट घेऊन ही नाराजी दूर करण्याचा व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याच माध्यमातून मराठा समाज आपल्याकडे वळविण्याचा देखील शिरीष चौधरींचा हा प्रयत्न आहे.
भाविकाळात चुका होणार नाहीत याची काळजी घेऊ : शिरीष चौधरी
सुमारे एक तास मनमोकळेपणे माजी आमदार अरुण पाटील यांच्याशी चर्चा झाली. गतकाळात झालेल्या चुकांबाबत क्षमा मागितली. तसेच पुढील रावेर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय त्यांच्या सल्ल्याने घेतले जातील अशी ग्वाही दिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उद्याच्या सभेचे निमंत्रण दिले अशी माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.