रोखठोक : राजकारणाचा आखाडा : रावेर मतदार संघात नकोशे पुढारी उमेदवारांच्या दावणीला : आम्ही कायम झेंडे लावायचे अन सतरंज्या उचलायच्या का ? खऱ्या कार्यकर्त्यांचा उद्विगन सवाल
पदाधिकारीच ठेकेदार व लाभार्थी असल्याने खरे कार्यकर्ते लांबच
प्रतिनिधी / रावेर
सोमवारी माघारीनंतर विधानसभा निवडणुकीचा आखाडा तापायला लागला आहे. रावेर मतदार संघात एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी प्रमुख चौघा उमेदवारात लढत होण्याची श्यक्यता आहे. मात्र काही उमेदवारांच्याभवती "नकोशे" असलेल्या पुढऱ्यांचा गराडा पाहायला मिळत आहे. याशिवाय पक्षाचे पदाधिकारी असलेले ठेकेदार व विविध माध्यमातून लाभ घेणाऱ्यांचा गोतावळा कायम उमेदवाराच्या चौहोबाजूनी असल्याने उमेदवाराशी महत्वाच्या विषयावर संवाद साधताना अडचणी येत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळे वर्षानुवर्षांपासून काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आम्ही कायम पक्षाचे झेंडे लावायचे आणि सतरंज्या उचलायच्या का? असा प्रश्न एका कार्यकर्त्याने एका उमेदवाराच्या प्रचार शुभारंभावेळी प्रसार माध्यमाकडे व्यक्त करत त्रागा केल्याचे पाहायला मिळाले.
रावेर मतदार संघात महायुतीचे अमोल जावळे, महाविकास आघाडीचे धनंजय चौधरी, प्रहार जनशक्तीचे अनिल चौधरी व अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद यांच्यात चौरंगी लढत होईल अशी स्थिती आज आहे. मात्र जसजशी निवडणूक टप्प्यात येईल तशी ही निवडणूक तिरंगी व नंतर दोन उमेदवारात आमनेसामने होण्याची अधिक शक्यता आहे. निवडणूक म्हटली की, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा गोतावळा आलाच. मात्र वर्षानुवर्षांपासून पक्षावर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांना मात्र "शायनींग" मारणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी लांब सारले आहे. उमेदवार व नेत्यांची चापलुशी करणारे लाभार्थी असलेले पदाधिकारी खऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारापर्यंत पोहचू देत नसल्याची माहिती एका राष्ट्रीय पक्षाचे वीस वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याने दिली. काही पक्षात हे नकोशे पुढारी असून त्यांचा फटका उमेदवाराला बसण्याची अधिक शक्यता आहे.
नकोशे पुढऱ्यांचे स्थान काय ?
प्रत्येक पक्षात सर्व समाजाला स्थान दिलेले आहे. मात्र या पक्षांमध्ये काही गावपुढारी असलेले पक्षाचे पदाधिकारी पक्षाच्या उमेदवाराच्या रथाचा मीच सारथी अशा अविर्रभावात वागताना पाहावयास मिळत आहेत. उमेदवार व नेत्यांच्या सभोवताली या गावपुढाऱ्यांची गर्दी असल्याने खरे कार्यकर्ते निवडणुकीपासून लांब जात आहेत. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार शुभारंभावेळी एका कार्यकर्त्याने वर्षानुवर्षे आम्ही पक्षाचे झेंडे लावायचे आणि सतरंज्याच उचलायच्या का? असा उद्विगन सवाल उपस्थित केला आहे. नकोशे असलेल्या गावपुढाऱ्यांचे अस्तित्व 23 नोव्हेंबरला लागणाऱ्या निकालानंतर दिसणार आहे. गावनिहाय मिळालेल्या मतांची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर या गावपुढाऱ्यांचे त्यांच्या गावातील व समाजातील अस्तित्व सर्वांसमोर येईल. कोणत्याच पक्षात सारेकाही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. शायनींग इंडिया ठरणाऱ्या पदाधिकारी ठेकेदारापासून पक्षाच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर लांब जाणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने मतदान प्रक्रियेवेळी कामकाजवार निश्चितच परिणाम होऊन मतदानाची टक्केवारी घटू शकते. याचा पक्षाच्या उमेदवाराला निश्चित फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पदाधिकारी ठेकेदारांकडून चापलुशी
रावेर मतदार संघात लोकप्रतिनिधिच्या आशीर्वादाने पदाधिकारी असलेल्या पुढाऱ्यांनी कोटींची विकासकामे मिळवली आहेत. सुरुवातीला प्रथम पक्षाचे कार्यकर्ते त्यानंतर पदाधिकारी व नंतर ठेकेदार असा प्रवास असलेले नेत्यांची चापलुशी करीत जवळीक साधत विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरले आहेत. चापलुशी करणारे हे पदाधिकारी कोण आहेत हे उमेदवार व पक्षाच्या नेत्यांच्या नजरेच्या टप्प्यात आहेत. मात्र निवडणुकीचा काळ असल्याने अवघड जागेवरच दुखणं अशी अवस्था उमेदवार व नेत्यांची झाली आहे. याच पदाधिकारी ठेकेदारांचा प्रसार मध्यमांशी सुसंवादचा अभाव आहे. प्रसार मध्यमांना दिलेल्या जाहिरातीचे पैसे एका वर्ष उलटूनही या पदाधिकारी ठेकेदार असलेल्या गावपुढाऱ्यांनी अद्याप दिलेले नाहीत. प्रसार मध्यमांचे जाहिरातीचे पैसे न देणाऱ्या या गावपुढाऱ्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. चापलुशी करणाऱ्या पदाधिकारी ठेकेदारापासून उमेदवारांनी व नेत्यांनी अंतर राखून काम करण्याची गरज आहे.