जैन इरिगेशनचा उपक्रम : १५० पेक्षा अधिक आंब्यांच्या जातीचे ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शन : उद्यापासून दोन दिवस चालणार महोत्सव
देशी-विदेशी व संकरित आंबा वाणांचा प्रदर्शनात समावेश

जळगाव /प्रतिनिधी
कृषी तंत्रज्ञान व संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचणाऱ्या जैन इरिगेशनने स्वत:च्या प्रात्यक्षिक क्षेत्रातील जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० पेक्षा अधिक जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात ‘मॅंगो फिस्टा’ हे प्रदर्शन २१ ते २२ मे दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. उद्या (दि २१ )सकाळी १० वाजता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विशेष म्हणजे या दोन दिवसात प्रदर्शनावेळी आंब्यापासून तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद ‘देशी ब्लिस’ येथे घेता येणार आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम्सने आंबा उत्पादन क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे. आंब्याच्या उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उच्च घनता व अतिउच्च घनता लागवड पद्धती, ठिबक सिंचन व खत सिंचनाचा वापर आदी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रयोग यशस्वी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे कंपनीकडून भव्य ‘जैन आंबा प्रदर्शन’ भरविण्यात आले आहे.
देशीपरदेशी जातीच्या आंब्याचा समावेश
या प्रदर्शनात देश-विदेशातून आणलेले आणि जैन इरिगेशनने स्वतः विकसित केलेले १५० पेक्षा अधिक आंबा वाण, जनुक प्रकार प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये १० विदेशी व ३० नवे संकरित वाणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे सर्व वाण जैन हिल्स येथील बागायत प्रयोगशाळेत पिकवलेले आहेत. जैन इरिगेशनच्या संग्रहात एकूण १६० वाणांचे संकलन आहे. त्यापैकी ८० वाणांचे प्रदर्शन या ठिकाणी आहे. तसेच संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ८०० हून अधिक संकरित वाणांपैकी ३० वाणांचे परीक्षणासह सादरीकरण यामध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनात काही वाणांचे फळ १ किलोपर्यंत वजनाचे, काही वाण अतिशय गोड चव असलेले, तर काही लालसर किंवा गडद पिवळ्या रंगात लाल छटा असलेले आहेत, जे अत्यंत स्वादिष्ट, देखणे व आकर्षक आहेत.