BREAKING : जिल्हाधिकाऱ्यांचे रसलपूर ग्रामपंचायतीच्या चौकशीचे आदेश : पदाधिकाऱ्यांची प्रकरण मिटवण्यासाठी धावाधाव

गैरव्यवहारात कोणाचा सहभाग चौकशीत येणार समोर

BREAKING : जिल्हाधिकाऱ्यांचे रसलपूर ग्रामपंचायतीच्या चौकशीचे आदेश : पदाधिकाऱ्यांची प्रकरण मिटवण्यासाठी धावाधाव

प्रतिनिधी/रावेर

रसलपूर(ता रावेर) येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून याबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. याची त्यांनी तात्काळ दखल घेवून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी बी. एस. अकलाडे यांना त्वरित चौकशी करून याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे रसलपूर येथे खळबळ उडाली असून पदाधिकाऱ्यांची प्रकरण मिटवण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे.

 रसलपूर येथील ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत सन २०२२ ते २०२५ या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून याची जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कर्मचारी व पदाधिकाऱ्यांवर  गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर याची दखल घेवून माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे हा प्रश्न उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मांडून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.

दरम्यान, याची तक्रार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे करण्यात आली असून त्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. रसलपूर ग्रामपंचायतीत खर्च झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी बी एस अकलाडे यांना दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आता कसून चौकशी अटळ आहे. दरम्यान चौकशीच्या फेऱ्यात आपण अडकू नये यासाठी काही पदाधिकाऱ्यांची शनिवारपासून प्रकरण मिटविण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे.