डॉ सुधाकर चौधरी व डॉ सुनील कोल्हे यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर : २६ जानेवारीला आमदार जावळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

सेवाभावी कार्याचा होणार गौरव

डॉ सुधाकर चौधरी व डॉ सुनील कोल्हे यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर : २६ जानेवारीला आमदार जावळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

प्रतिनिधी / रावेर

रावेर तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटनेतर्फे दोन डॉक्टरांना उत्कृष्ट सेवेसाठी दिला जाणारा डॉ. सॅम्युअल हॅनिमन सेवा गौरव पुरस्कार डॉ.सुधाकर धर्मा चौधरी (निंभोरा) व डॉ.सुनील रामकृष्ण कोल्हे (खिर्डी) यांना जाहीर झाला आहे. २६ जानेवारीला  रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते व रावेर तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटनेचे अध्यक्ष डॉ विजय धांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणारा आहे.

 दरवर्षी या संघटनेतर्फे उत्कृष्ट कार्य व सेवा देणाऱ्या दोन डॉक्टर बांधवांना डॉ. सॅम्युअल हॅनिमन सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार डॉ. सुधाकर धर्मा चौधरी निंभोरा व डॉ.सुनील रामकृष्ण कोल्हे खिर्डी यांना जाहीर झाला आहे. २६ जानेवारीला आमदार अमोल जावळे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार दोघा डॉक्टरांना सपत्नीक  प्रदान करण्यात येणार आहे. या दोघांनी ४० ते ४५ वर्षाच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेत वेगवेगळ्या प्रकारचे रोग निवारक शिबिर, हेल्थ चेकअप, जनजागृतीपर व्याख्याने आयोजित करून, रंजल्या गांजलेल्या लोकांची नेहमी सेवा केली आहे. शासनावर आरोग्य सेवेचा ताण आला त्यावेळी उस्फूर्तपणे रावेर तालुका होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर संघटनेच्या डॉक्टरांनी नेहमीच मदतीचा हातभार लावला आहे. नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा व यातून प्रेरणा मिळावी तसेच डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक व्हावे, या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे आहे.

संघटनेचे ३५ वर्षापसून काम

हि संघटना गेल्या ३५ वर्षापासून कार्यरत सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. आपत्ती काळात शासनास मदत, दरवर्षी पारिवारिक मेळावा, डॉक्टरांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार,  गुणगौरव, संघटनेच्या सदस्यांनी वेळोवेळी आयोजित केलेली रोग निदान शिबिरे, व्याख्याने अशा अनेक प्रकारचे उपक्रम या कालखंडात संघटनेने राबविले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. सुधाकर चौधरी व डॉ. सुनील कोल्हे यांचे आमदार अमोल जावळे संघटनेचे अध्यक्ष डॉ.विजय धांडे, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद कात्रे, डॉ. सौ संगीता महाजन, सचिव डॉ.कमलाकर चौधरी, खजिनदार डॉ.सुनील महाजन यांनी अभिनंदन केले आहे.