खानापूरच्या यात्रोत्सवाला २०० वर्षांची परंपरा : पेटत्या गेंदमाळेखाली भगतांचे नृत्य ठरते यात्रेचे आकर्षण

तीन दिवस कानिफनाथांचा जागर : २१ हंड्यांचा वरणाचा महाप्रसाद

खानापूरच्या यात्रोत्सवाला २०० वर्षांची परंपरा : पेटत्या गेंदमाळेखाली भगतांचे नृत्य ठरते यात्रेचे आकर्षण
खानापूरच्या यात्रोत्सवाला २०० वर्षांची परंपरा : पेटत्या गेंदमाळेखाली भगतांचे नृत्य ठरते यात्रेचे आकर्षण

 कृष्णा पाटील / रावेर 

खान्देशसह मध्यप्रदेशातील निमाड येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान तथा आराध्य दैवत असलेल्या श्री कानिफनाथ उर्फ कन्हैय्यालाल महाराज यांच्या यात्रोत्सवाला खानापूर येथे आजपासून (दि.९ फेब्रुवारी) सुरूवात होत आहे. ९ फेब्रुवारीला तापी नदीवरील संगमावर काठी स्नान, १० फेब्रुवारीला श्री कानिफनाथ (कन्हैय्यालाल) महाराज गादी दर्शन, गेंदमाळा, महाप्रसाद व ११ फेब्रुवारीला धर्मबीज असा तीन दिवस हा यात्रोत्सव चालणार आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर संस्थान व लोकवर्गणीतून दत्तमंदिराचे नुतनीकरण करण्यात आले आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

खानापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या परशुराम भगत यांना श्री कानिफनाथांचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांनी थेट अहमदनगर जिल्ह्यातील पंचमढी येथील श्री कानिफनाथांच्या समाधीस्थळी जाऊन कसोटी पणाला लावली होती. त्यावेळी समाधीस्थळ संस्थानतर्फे तर्फे त्यांना एक टोप व सिंहासन (गादी) प्रदान करण्यात आली. परशुराम भगत यांनी खानापूर येथे श्री कानिफनाथांच्या सिंहासनाची स्थापन करून पौष वद्य अमावस्या, माघ शुद्ध प्रतिपदा व धर्म बीजेनिमित्त खानापूर, निरुळ व अहिरवाडी या तिन्ही गावात यात्रा महोत्सवाची धर्मपताका फडकावली. या महोत्सात्वाला सुमारे सोंशे वर्षांची परंपरा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

नवसाला पावणारा देव

खानापूर येथील श्री कानिफनाथ महाराज हे नवसाला पावणारा देव अशीच ख्याती सर्वत्र आहे. त्यामुळे शेकडो भाविक आपल्या इच्छा, आकांशा व प्रश्न सोडविण्यासाठी कानिफनाथ महाराजांसमोर नतमस्तक होतात व नवस बोलतात. बहुतांशी नागरिकांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण झाल्यावर या भाविकांकडून नवस फेडले जातात. दरवर्षी नवस फेडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

५१ फूट उंचीचा ध्वजस्तंभ

पौष वैद्य अमावस्या या तिथीला खानापूर, निरूळ, अहिरवाडी येथील कन्हैय्यालाल देवस्थानच्या सुमारे ५१ फुट उंचीच्या ध्वजस्तंभला (काठी) अजनाड येथील तापी, नागोई व खळखळी या तिन्ही नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वाजतगाजत  अभ्यंगस्नान केले जाते. ध्वजस्तंभास नविन वस्त्र परिधान केले जाते व ध्वज फडकविण्यात येतो. या दिवशी अजनाड येथे मोठ्या उत्साहात यात्रोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी खानापूरात काठीची गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. यावेळी नागरिक काठीचे दर्शन घेतात.

पेटते गेंद यात्रेचे आकर्षण

माघ शुद्ध प्रतिपदेला खानापूरसह निरूळ, अहिरवाडी, कर्जोद, निंभोरासीम येथे यात्रोत्सव साजरा केला जातो. सर्व ग्रामस्थ कानिफनाथ महाराजांच्या गादीचे दर्शन घेतात. रिद्धी-सिद्धी प्राप्त असलेले पानगे (बाटी) तयार करून भाजतात. सायंकाळी सर्व भगतवृंद, भाविक, ग्रामस्थांसह सवाद्य मिरवणुकीद्वारे बस थांब्यावरील भक्तांच्या समाधी स्थळी समाध्यांचे दर्शन घेवून पंचारती लावली जाते. यानंतर समाधी स्थळापासून  प्रमुख मार्गाने सवाद्य मिरवणूक काढली जाते. कन्हैय्यालाल महाराज यांच्या नामाच्या गजरात भाविक तल्लीन होऊन जातात. मंदिराच्या आवारात सुमारे २०० ते ३०० फुट लांब व १५ ते २० फुट उंच अशा ५-५ फुट अंतरावर लोखंडी साखळीत गोडेतेलात बुडवलेले ६१ गेंद अडकवले असतात. भगतांकडून हे गेंद पेटवून पेटवल्यानंतर या पेटत्या गेंदाखाली भगत वाद्याच्या तालावर गेंदांच्या रिंगणात नृत्य सादर करतात. हे यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. मंदिराच्या आवारात पुजापत्री, खेळणे, मिठाई यांची दुकाने थाटली जातात.

महाप्रसाद व भंडारा -

सर्व यात्रेकरू व ग्रामस्थांसाठी देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचा (भंडा-याचा) कार्यक्रम आयोजन करण्यात येतो.  यात्रेकरू व भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.

पाच पावली व धर्मबीज सोहळा-

माघ शु. द्वितीयेस धर्मबीजचे औचित्य साधून श्री धमनाथाचे शक्ती स्थळ असलेले चोरवड शिवारातील पाचपावली येथे भक्तगण जावून त्या समाधी स्थळाला भेट देतात. याच कार्यक्रमाने यात्रेची सांगता होते. यात्रेच्या यशस्वीतेसाठी कन्हैय्यालाल देवस्थानचे सर्व कार्यकारी समिती ग्रामपंचायत प्रशासन विविध सार्वजनिक मंडळे, ग्रामस्थ परिश्रम घेतात. यात्रोत्सवादरम्यान पंचक्रोशीतील भाविक तथा नागरिकांनी  दर्शन तथा महाप्रसादाचा लाभ घ्यावा व शांततेचे  आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

--