खरीप हंगाम : रावेर तालुक्यात 3,500 एकरने कापसाची लागवड घटणार
कृषी विभागाने व्यक्त केला अंदाज
प्रतिनिधी / रावेर
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक भाव न मिळाल्याने कापूस उत्पादनाचा खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही. गेल्या हंगामातील उत्पादन घेतलेला कापसाची मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे येत्या खरीप हंगामात रावेर तालुक्यात कापसाच्या लागवड क्षेत्रात सुमारे 1370 हेक्टरने घट येण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
खरीप हंगामातील रावेर तालुक्यातील प्रमुख पीक हे कापूस आहे. दरवर्षी सुमारे १७००० हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाला योग्य दर मिळत नसल्याची स्थिती होती. कापसाचे भाव वाढण्याच्या आशेने दोन हंगामातील कापूस शेतकऱ्यांनी सांभाळून ठेवला होता. मात्र कापसाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याने तोट्यात कापसाची शेतकऱ्यांना विक्री करावी लागली होती.
शासनाची उदासीनता
शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून असताना शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. कापसाची शासनाने कमी भावाने खरेदी करणे अपेक्षित असताना याकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे सतत दुर्लक्ष झाले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात रावेर तालुक्यातील कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात सुमारे 1,370 हेक्टर म्हणजेच 3,500 एकर क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. ज्वारी व कडधान्याच्या लागवरीचे क्षेत्र यामुळे वाढणार आहे.
रावेर तालुक्यातील कापूस लागवडीखालील क्षेत्रात घट येण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर हळद व मका लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी ८०ते १०० मिलीमीटर पाऊस पडल्यावरच पेरणी करावी. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करावा.
----- भाऊसाहेब वाळके, तालुका कृषी अधिकारी , रावेर
--