पंतप्रधान किसान सुविधा केंद्र योजना २७ जुलैपासून सुरु : पंतप्रधान साधणार शेतकऱ्यांशी संवाद

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : अमोल जावळेंचे आवाहन

पंतप्रधान किसान सुविधा केंद्र योजना २७ जुलैपासून सुरु : पंतप्रधान साधणार शेतकऱ्यांशी संवाद

प्रतिनिधी I रावेर

शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी “प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रच्या” माध्यमातून पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना २७ जुलैपासून सुरु करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उदघाटन होणार असून ते यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी केले आहे. 

या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागणार नाही. तसेच धावपळ व वेळ वाचणार आहे. सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रूपांतर आता वन स्टॉप शॉपमध्ये होणार आहे.

या योजनेचे उदघाटन २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी ८.५ करोड पीएम किसान लाभार्थी यांना १४ व्या हप्त्याचे हस्तांतरण होणार आहे. २७ जुलैला सकाळी ११ वाजता ते सवांद साधणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी http://pmevents.ncog.in या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे किंवा https://pmindiawebcast.nic.in  या लिंक वर जावून ऑनलाईन कार्यक्रम सुध्दा बघू शकतील. तसेच सदरील कार्यक्रम जवळील कृषी केंद्रावर लावलेल्या टीव्हीवर सुद्धा शेतकरी बघू शकणार आहे. सदरील कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.