अन्न प्रक्रिया उद्योगांना शासकीय योजनांचे बळ : संतोष गवळी

उद्योजकासाठी जळगावात प्रशिक्षण कार्यशाळा

अन्न प्रक्रिया उद्योगांना शासकीय योजनांचे बळ : संतोष गवळी

प्रतिनिधी/जळगाव

तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. त्‍याप्रमाणे अन्न प्रक्रिया उद्योगातही आधुनिक तंत्राच्‍या सहाय्याने व्‍यवसायाच्‍या व्‍यापक संधी उपलब्‍ध आहेत. या क्षेत्रातील क्षमता लक्षात घेता या क्षेत्रास शासकीय योजनांचे बळ उपलब्‍ध असून, अधिकाधिक व्‍यावसायिक, उद्योजकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन  जळगाव जिल्‍हा उद्योग केंद्राचे जीएम संतोष गवळी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी 'झेड प्रमाणीकरण' प्रक्रियेबाबत विशेष जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, जिल्हा उद्योग केंद्र आणि डब्‍ल्‍यूएक्स कन्सल्टंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्‍या सुरुवातीस डब्‍ल्‍यूएक्स कन्सल्टंट्सच्या संचालिका आणि स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या संस्थापिका दीपाली चांडक यांनी प्रास्‍ताविक केले. कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विशद करताना त्‍यांनी तांत्रिक पाठबळ आणि स्व-मूल्यांकनाचे महत्त्व विषद केले. श्री गवळी मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी 'झेड' प्रमाणीकरण करणे काळाची गरज आहे. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. स्थानिक उद्योजकांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी स्वतःच्या प्रक्रियांचे आधुनिकीकरण करावे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स-उत्तर महाराष्ट्रच्‍या उपाध्यक्षा संगीता पाटील म्‍हणाल्‍या, उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांना तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स नेहमीच कटिबद्ध आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांनी प्रक्रियेतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढविण्यासाठी ही कार्यशाळा फायदेशीर ठरेल. या कार्यशाळेत तज्ज्ञ 'झेड' प्रशिक्षकांनी दोन तांत्रिक सत्रांमध्ये उद्योजकांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने स्व-मूल्यांकन, तांत्रिक लेखापरीक्षण आणि प्रक्रियांचे सुलभीकरण या विषयांवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप डब्‍ल्‍यूएक्स कन्सल्टंट्सच्या एमएसएमई डेस्कच्या वरिष्ठ व्यवस्थापिका गौरी बैरागी यांनी आभार मानले. राहुल बैसाने, निखिलेश काळे, स्‍वाती देवरे, भारत शेंडगे यांनी विशेष परीश्रम घेतले.