उद्योजक अशोक जैन यांच्या वाढदिवसातून उमटले शेतीमातीवरील प्रेम व शेतकऱ्यांप्रती आदरभाव

जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ संत्रा वाणाचे लोकार्पण

उद्योजक अशोक जैन यांच्या वाढदिवसातून उमटले शेतीमातीवरील प्रेम व शेतकऱ्यांप्रती आदरभाव
- नव्याने विकसीत केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या वाणाचे लोकार्पण करताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि सौ. ज्योती जैन, शेजारी कल्याणी नागुलकर, सौ. शोभना जैन, अजित जैन, डॉ. भावना जैन, सौ निशा व अनिल जैन डॉ. बी.के. यादव..

प्रतिनिधी/जळगाव

जैन इरिगेशनचे संस्थापक स्व. श्रद्धेय भवरलाल जैन यांचे शेतीमातीवरील प्रेम व शेतकऱ्यांप्रती असलेला आदरभाव, संस्कार व समाजकारणाचा वारसा त्यांच्या पश्च्यात जैन परिवाराने अखंडपणे जोपासला आहे. याचा प्रत्यय मंगळवारी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्ताने तमाम शेतकरी बांधवाना आला आहे. शेतकऱ्यांसाठी जैन इरिगेशनने संशोधित व विकसित केलेल्या जैन मॅडरिन-१या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण अशोक जैन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री जैन यांच्यासह सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते सपत्नीक जैन हिल्सवर करण्यात आले. या सोहळ्याला जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा वारसा भक्कमपणे पुढे नेणाऱ्या जैन परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. तसेच जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि सहकारी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने नव्याने विकसीत केलेली जैन मॅडरिन-१ही संत्रा वाणाची जात आहे. शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले हे एक आधुनिक आणि उत्पन्नक्षम संत्र्याचे नवीन वाण आहे. पारंपरिक संत्र्याच्या तुलनेत ही जात लवकर फळधारणा होणारी आहे. या वाणामुळे कमी कालावधीत दर्जेदार माल बाजारात उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची संधी आहे. विशेष म्हणजे दुसऱ्याच वर्षापासून झाडांना फळधारणा सुरू होते, त्यामुळे संत्रा बाग गुंतवणुकीवर लवकर परतावा मिळतो. या संत्र्याची चव ही नागपूर संत्र्यापेक्षा अधिक गोड असून फळांचा रंग आकर्षक, गडद आणि लालसर केशरी  असतो. फळांचा आकार, सोलण्याची सुलभता आणि रसाळपणा यामुळे जैन मॅडरिन-१हा टेबल पर्पज म्हणजेच थेट खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असे दर्जेदार फळ मिळत असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेसोबतच निर्यातीसाठीही ही जात आशादायक ठरू शकते असा विश्वास कंपनीचे लिंबू वर्गिय फळांचे संशोधक डॉ. मिलींद लदानिया यांनी सांगितले. उत्पादनाच्या दृष्टीने ही जात भरघोस उत्पादन देणारी आहे. या जातीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फुलधारणा करण्यासाठी पाण्याचा ताण  देण्याची आवश्यकता नसते.  त्यामुळे पाणी व्यवस्थापन अत्यंत सुलभ होते. कमी पाण्यातही स्थिर उत्पादन देणारी जैन मॅडरिन-१ही जात बदलत्या हवामानात आणि मर्यादित संसाधनांमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो.