मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल जावळे यांचे रक्तदान

32 जणांनी केले रक्तदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल जावळे यांचे रक्तदान

प्रतिनिधी | रावेर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे बक्षीपूर विविध कार्यकारी सोसायटीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार अमोल जावळे यांनी स्वतः रक्तदान करीत शिबिराला सुरुवात केली. या रक्तदान शिबिरात ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. 

यावेळी आमदार जावळे यांनी स्वतः रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, अभ्यासू वृत्ती आणि जनहिताला प्राधान्य देणारी कार्यशैली राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारी आहे. त्यांनी विकासकामे आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच, दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनीही आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात राज्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील असे मत आमदार जावळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि स्व. अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येकाने अशा सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री जावळे यांनी यावेळी उपस्थितांना केले. 

कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन, माजी आमदार अरुण पाटील, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष सुरेश धनके, राज्य परिषद सदस्या गोमती बारेला, जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, कृ.ऊ.बा. सभापती प्रल्हाद पाटील, जिल्हा चिटणीस विजय महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष राजन लासूरकर, सुनील पाटील, अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, पी. के. महाजन, शिवसेना (शिंदे गट) तालुका संघटक राहुल पाटील, तालुकाध्यक्ष वाय. व्ही. पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टी रावेर उत्तर व दक्षिण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजसेवेचा संदेश देण्यात आला.