रावेरला महाविकास आघाडीचा झेंडा : रावेर बाजार समितीत १३ जागा महाविकास आघाडीला भाजप शिंदे गटाच्या तीन, तर अपक्षांचा २ जागांवर विजय 

रावेरला महाविकास आघाडीचा झेंडा

रावेरला महाविकास आघाडीचा झेंडा : रावेर बाजार समितीत १३ जागा महाविकास आघाडीला   भाजप शिंदे गटाच्या तीन, तर अपक्षांचा २ जागांवर विजय 
विजयानंतर जल्लोष करताना आमदार चौधरी, माजी आमदार अरुण पाटील,पाटील, किशोर पाटील महेमूद शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते

प्रतिनिधी / रावेर

येथील बाजार समितीच्या चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महा विकास आघाडीच्या पॅनलने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. तर भाजप शिंदे गटाच्या पॅनलला ३ जागा मिळाल्या असून दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. जनशक्ती प्रहार पक्षाच्या परिवर्तन पॅनलला खाते उघडता आले नाही. निवडणुक निरिक्षक म्हणून तहसिलदार बंडू कापसे, निवडणुक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी व बाजार समितीचे सचिव गोपाल महाजन यांच्या देखरेखीत मतमोजणी करण्यात आली.  

येथील बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी स्वामी विवेकानंद विद्यालयात पार पडली. हमाल मापाडी मतदार संघातून महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार सैयद असगर हे विजयी होत महाविकास आघाडीच्या विजयाचा श्री गणेशा केला. महाविकास आघाडी विरुध्द भाजप शिंदे गटाच्या पॅनलमध्ये खरी लढत झाली होती. सर्वपक्षीय पॅनलची गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित करीत भाजपला बाजार समितीच्या सत्तेपासून दूर ठेवण्यात माहविकास आघडीचे नेते व आमदार एकनाथ खडसे, आमदार शिरीष चौधरी माजी आमदार अरुण पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे योगीराज पाटील यांना यश मिळाले आहे. विजयानंतर मतमोजणी केंद्रापासून माजी आमदार अरुण पाटील यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत कार्यकर्त्यांतर्फे जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार शिरीष चौधरी, राजीव पाटील, मोहान पाटील, शिवसेनेचे योगीराज पाटील, सोपान पाटील, यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

महाविकास आघाडीचे विजयी झालेले उमेदवार

सोसायटी मतदार संघ :

मंदार मनोहर पाटील (राष्ट्रवादी), राजेंद्र पंढरीनाथ चौधरी (राष्ट्रवादी ), योगीराज गाबजी पाटील (ठाकरे गट), पंकज राजीव पाटील (काँग्रेस), डॉ राजेंद्र नारायण पाटील (काँग्रेस) 

महिला राखीव मतदार संघ :

मनीषा सोपान पाटील (काँग्रेस)

ओबीसी मतदार संघ :

सचिन रमेश पाटील (राष्ट्रवादी)

भटक्या विमुक्त जातीजमाती :

जयेश राजेंद्र कुयटे (राष्ट्रवादी)

ग्रामपंचायत सर्व साधारण :

योगेश बिजलाल पाटील (काँग्रेस)

आर्थिक दुर्बल घटक :

पांडुरंग शिवदास पाटील (राष्ट्रवादी)

व्यापारी मतदार संघ :

रोहित अनिल अग्रवाल (काँग्रेस)

विलास श्रावण चौधरी (ठाकरे गट)

हमाल मापाडी मतदार संघ.:

सैय्यद असगर सैयद तुकडू ( राष्ट्रवादी)

भाजप -शिंदे गटाचे उमेदवार :

प्रल्हाद पंडित पाटील भाजप (सोसायटी मतदार संघ) ,सविता दिनेश पाटील शिंदे गट (महीला राखीव), सिकंदर जमशेर तडवी भाजप (अनुसूचित जाती जमाती)

अपक्ष विजयी उमेदवार :

गणेश ज्ञानेश्र्वर महाजन( ग्रामपंचायत मतदार संघ) पितांबर रामभाऊ पाटील (सोसायटी मतदार संघ).

मतदार सुज्ञ असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घडलेल्या घटनांचा राजकीय हिशोब मतदारांनी चुकता करीत विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. तालुक्यातील जनतेचा महा विकास आघाडीवर विश्वास असल्याचे दिसून आले आहे.

अरूण पाटील,माजी आमदार रावेर

सत्तेतील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी असून भाजप शिंदे गटाच्या पॅनलला नाकारत सरकारबद्दल जनतेच्या मनात असलेला रोष दाखवून दिला आहे. महाविकास आघाडीला विजयी करीत शेतकऱ्यांच्या विकासाची संधी दिली आहे.

शिरिष चौधरी आमदार रावेर

पक्षीय बलाबलराष्ट्रवादी काँग्रेस -६, काँग्रेस -५शिवसेना ठाकरे गट -२,भाजप -२ शिंदे गट -१ अपक्ष -२