निवडणूक : रावेर बाजार समितीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

निवडणूक

प्रतिनिधी / रावेर 

शुक्रवारी होणाऱ्या येथील बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तीन पॅनलमध्ये अतिशय अटीतटीची व चुरशीची होणारी निवडणुक उमेदवारांचे अस्तित्व पणाला लावणारी  आहे. 

येथील बाजार समितीच्या गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीची सर्वपक्षीय पॅनलची परंपरा राष्टवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या भूमिकेमुळे यंदा प्रथमच मोडीत निघाली आहे. महाविकास आघाडीने स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे भाजप-शिंदे गटालाही पॅनल तयार करावे लागले आहे. या दोन्ही पॅनलमध्ये उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी एकत्र येत जनशक्ती प्रहार पक्षाचे परिवर्तन पॅनल उभे करीत दोन्ही पॅनलला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. 

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे स्वतंत्र पॅनल उभे केले असून या पॅनलचे नेतृत्व माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील , राजीव पाटील करीत आहेत. तर भाजप शिंदे गटाचे नेतृत्व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदशनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन करीत आहेत. जनशक्ती प्रहार पक्षाचे अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात परिवर्तन शेतकरी पॅनल उभे आहे. अतिशय चुरशीच्या व अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत विजयासाठी तिन्ही पॅनलतर्फे प्रयत्न सुरु आहेत. निवडणूक बाजार समितीची असली तरी भाजप राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांची मात्र प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

जुने हिशोब होणार चुकते 

गेल्या पाच वर्षात राजकारणात मोठे बदल झाले आहेत. आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचा प्रमुख विरोध भापच्या पॅनलला आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न असेल. तर जिल्हा बँक निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसल्याची भावना माजी आमदार अरुण पाटील यांची आहे. याचा बदला या निवडणुकीच्या निमित्ताने निघू शकतो. तर भाजप शिंदे गटाचे पॅनल एकत्र असताना अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय आहे.