लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या मदतीचा अधिवेशनात प्रश्न मांडावा

आमदार शिरीष चौधरी घेणार मंत्र्यांची भेट ; सरसकट मदतीची शेतकऱ्यांची मागणी

लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या मदतीचा अधिवेशनात प्रश्न मांडावा

कृष्णा पाटील / रावेर 

रावेर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत अतिवृष्टी झाल्यामुळे केळीसह खरीप हंगाम धोक्यात आला आहे. केळीबागा व इतर पिकांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर तुंबल्याने हि पिके सडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. लोकप्रतिनिधी व शासनाने याची दखल घेऊन रावेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टीची आर्थिक मदत तातडीने द्यावी. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असून सर्वच लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडल्यास यातून शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळू शकेल. 

५ जुलै, १९ जुलै व २२ जुलैला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यात सुमारे २२ हजार हेक्टरवर केळीची दरवर्षी लागवड केली जाते. तर १७ ते १८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होते. जुलैमध्ये गेल्या पंधरा दिवसांत तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी तुंबले आहे. अधिक काळ केळी बागा व कापूस तसेच खरीप हंगामातील इतर पिकांमध्ये पाणी थांबुन राहिल्याने या पिकांची मुळे कुजली आहेत. त्याचा परिणाम म्हणून या पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अतिवृष्टी व ढगाळ हवामानाचा परिणाम कापसाच्या पिकावर झाला असून कापसाच्या पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव तालुक्यातील विविध गावांच्या शेतशिवारात दिसून येत आहे. यामुळे पिकावर शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेला खर्च पाण्यात गेला आहे. 

अधिवेशनात प्रश्न मांडावा 

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. जिल्ह्यात व तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व अनिल पाटील हे तीन मंत्री सत्तेत आहेत. या तिघांनी एकत्र येत जिल्ह्यातील तसेच रावेर तालुक्यातील परिस्थिती पाहता सरसकट शेतकऱ्यांना आपत्कालीन निधीतून आर्थिक मदत द्यावी. मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन विभाग आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी आर्थिक मदत मिळवून देत दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तसेच माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुरु असलेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना सरसकट मदतीचा प्रश्न प्रभावीपणे मांडावा अशी अपेक्षा आहे.

"रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असल्याने शेतकऱ्यांना अर्थिक मदत मिळण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेणार आहे. तसेच आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय धोरणात बदल करण्याची विनंती करण्यात येणार असून अधिवेशनात याबाबतचा प्रश्न मांडण्यात येईल." 

शिरिष चौधरी, आमदार रावेर 

"अतिवृष्टीमुळे रावेर तालुक्यातील ३० टक्के क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने केळी बागांवर इर्व्हिनिया रॉट व सीएमव्ही रोगाचा तर कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची अधिक शक्यता आहे."

महेश महाजन, कीड व रोग शास्त्र विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल जि. जळगाव  

"पंधरा दिवसात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आस्मानी संकटामुळे शेतकरी उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी यासाठी लोकप्रतिनिधींकडे मागणी करणार आहे. 

सुनील कोंडे , तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी ओबीसी सेल रावेर